जे लोक कठोर परिश्रम करण्यावर विश्वास ठेवतात आणि कधीही हार मानत नाहीत त्यांच्यासाठी आयुष्य कधीच निराशाजनक असू शकत नाही. वत्सल नहाटा देखील असाच एक तरुण आहे की ज्यानं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना केला. पण हार मानली नाही आणि स्वप्न पूर्ण करुन दाखवलं. श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीधर असलेल्या वत्सल नहाटा याची कहाणी खूप आश्चर्यकारक आहे.
वर्ल्ड बँकेत नोकरी करण्याचं वत्सलचं स्वप्न होतं. अशा परिस्थितीत त्यानं आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. जवळपास ६०० कोल्ड ईमेल्स आणि ८० कॉल्सनंतर वत्सल नाहटाला अखेर त्याची स्वप्नवत नोकरी मिळाली. कोविड-19 महामारीच्या काळात वत्सलचा प्रवास सुरू झाला. २०२० मध्ये तो अमेरिकेतील येल विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण करणार होता. मात्र, त्यावेळी मंदीचं वातावरण होतं आणि कंपन्या लोकांना कामावरून काढण्यात गुंतल्या होत्या. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इमिग्रेशनबाबतची भूमिकाही कठोर होती. केवळ अमेरिकन नागरिकांनाच नोकरीवर ठेवलं पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.
अशी मिळवली नोकरीअमेरिकेत नोकरी मिळत नसेल तर येलमध्ये येऊन काय उपयोग, असं वत्सल याला सुरुवातीला वाटलं. "माझ्या आई-वडिलांनी मला फोन करून विचारलं की माझं कसं चाललंय, तेव्हा पालकांना योग्य गोष्ट सांगणं माझ्यासाठी कठीण होतं. पण मी भारतात न जाण्याचा निर्धार केला होता. पर्याय नव्हता आणि माझा पहिला पगार डॉलर्समध्ये असावा अशी माझी खूप इच्छा होती", असं वत्सल सांगतो. दोन महिन्यांच्या कालावधीत त्यानं १५०० हून अधिक लिंक्डइन रिक्वेस्ट पाठवल्या, ६०० कोल्ड-ईमेल लिहिले आणि ८० लोकांना कॉल केले.
"मला आतापर्यंतच्या सर्वाधिक नकारांचा सामना करावा लागला. पण गरज ओळखून मी स्वत:ला बळ दिलं होतं. मी कुठेही जात नव्हतो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत माझ्याकडे 4 नोकरीच्या ऑफर होत्या आणि मी जागतिक बँकेत काम करण्याचा निर्णय घेतला. माझ्या OPT नंतर कंपनी माझा व्हिसा स्पॉन्सर करण्यास तयार होती. माझ्या व्यवस्थापकानं मला जागतिक बँकेच्या सध्याच्या संशोधन संचालकांसोबत मशीन लर्निंग पेपरचे सह-लेखक करण्याची ऑफर दिली'', असं वत्सल यानं सांगितलं.