योग्य शिक्षणासोबतच, मुलांच्या चांगल्या संगोपनात जीवन कौशल्याचा महत्त्वाचा वाटा असतो. जीवन कौशल्ये म्हणजे त्या पद्धती ज्या मुलाला जीवन जगण्यात उपयोगी पडतील. यामुळे मुलाचे भविष्य सुधारेल आणि तो कोणावरही अवलंबून राहणार नाही. ही लहान कौशल्ये नेहमीच मुलांसाठी उपयुक्त असतात. अनेक पालक मुलांना कौशल्य शिकविण्यासाठी मोठे होण्याची वाट पाहतात. पण तज्ज्ञांच्या मते, लहानपणापासूनच मुलाला जीवन कौशल्यांबद्दल सांगितले पाहिजे.
श्रमाचे महत्त्व पटवा
लहानपणापासून आपल्या मुलांवर श्रमसंस्कारांची जोपासना करा. श्रमाने आपल्यातील गुणांचे सोने होते, हे त्यांना शिकवा. श्रमाने आपली बौद्धिक आणि शारीरिक वृद्धी होत असते. आणि या वृद्धीचा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात सिंहाचा वाटा असतो.
वेळेचा सदुपयोग
आयुष्यात एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही, म्हणून मुलांना सुरुवातीपासूनच वेळेचा सदुपयोग करायला शिकवा. त्यांच्या कौशल्यांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणाऱ्या शाळेत त्यांची ॲडमिशन करा. वेगवेगळ्या स्पर्धा पाहायला तसेच स्पर्धेत सहभाग घ्यायला त्यांना प्रोत्साहन द्या.
प्रोत्साहन द्या
मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्याबाबत त्यांना प्रेरणा देऊन त्यातील त्यांची प्रेरणेची पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी जमवू द्या. त्यासाठी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, व्हिडीओ आदी खरेदी करू शकता.
मुलांना मोकळीक द्या
मूल जराही मोकळे दिसले तर पालक लगेच अभ्यास कर... हे कर... ते कर...म्हणजे कशात तरी गुंतवून ठेवतात. मात्र यामुळे त्यांच्यातील कौशल्य लुप्त होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. मुलाला त्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेशी मोकळीक द्या.