मुंबई - ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ओएनजीसी) नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ओएनजीसीने ३ हजार १४ अप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ही १५ मे रोजी ६ वाजेपर्यंत आहे.
या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार हे ongcaprentices.ongc.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. रिझल्ट्स किंवा अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी २३ मे २०२२ रोजी जारी केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड मेल आयडीच्या माध्यमातून माहिती दिली जाईल.
ओएनजीसीमध्ये एकूण ३ हजार ६१४ रिक्त पदे आहेत. ज्यामध्ये उत्तर क्षेत्रात २०९, मुंबई क्षेत्रामध्ये ३०५, पश्चिम क्षेत्रामध्ये १४३४, पूर्व क्षेत्रामध्ये ७४४, दक्षिण क्षेत्रामध्ये ६९४ आणि सेंट्रल क्षेत्रामध्ये २२८ पदे रिक्त आहेत. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय १५ मे २०२२ पर्यंत किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म हा १५ मे १९९८ ते १५ मे २००४ या दरम्यान झालेला असावा.
एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वरील वयोमर्यादेमध्ये ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. पीडब्ल्यूबीडी श्रेणीशी संबंधित उमेदवारांना वयोमर्यादेत १० वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेतून पात्र ठरणाऱ्या ग्रॅज्युएट अप्रेंटिसला दरमहा ९ हजार रुपये, ट्रेड अप्रेंटिसला एक वर्षाच्या आयटीआयसाठी ७ हजार ७०० रुपये आणि दोन वर्षांच्या आयटीआयसाठी ८ हजार ५०० रुपये आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी ८ हजार ५० रुपये आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी ८ हजार रुपये मानधन मिळेल. त्याशिवाय ओएनजीसी प्रवास भत्ता म्हणून कुठलीही आर्थिक मदत दिली जाणार नाही.