मागील काही वर्षांत प्रादेशिक भाषांचे महत्त्व पुन्हा एकदा वाढते आहे. या भाषांच्या जाणीवपूर्वक सखोल अभ्यासातून करिअरच्या नव्या शाखा विद्यार्थ्यांना शोधण्याची संधी मिळत आहे. त्यातील अनुवाद या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून याकरिता किमान दोन भाषांमध्ये प्रावीण्य असणे गरजेचे आहे.
अनुवादकाचे करिअर आनंद आणि समाधानासोबतच उत्तम मानधन देऊ शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची संख्या वाढल्याने प्रादेशिक भाषांमधील संधींना वाव मिळत आहे. त्यांच्याशी कामकाज सुरळीत होण्याच्या दृष्टीने अनेकदा विविध कागदपत्रांच्या अनुवादाची गरज तितकीच वाढत आहे. इंग्रजी, फ्रेंच, चिनी, जपानी, स्पॅनिश अशा भाषांची जाण असलेल्या आणि त्याचा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्यांची गरज वाढत आहे. भाषा अस्खलितपणे आली, भाषेतील बारकावे समजले की, अनुवाद करणे सोपे होते. त्यामुळेच ज्या भाषेचा अनुवाद करायचा आहे अशी भाषा आणि ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे, ती भाषा अशा दोन्ही भाषेत विद्यार्थी पारंगत असायला हवे.
अनुवादाची कला साध्य करण्यासाठी विद्यापीठातील किंवा दर्जेदार संस्थेतून दीर्घकालीन मुदतीचा परदेशी भाषाविषयक पदविका अथवा पदवी अभ्यासक्रम करणेही संयुक्तिक ठरते. असे अभ्यासक्रम मुंबई, पुणे आणि इतर विद्यापीठांनी सुरू केले आहेत. यातील काही अभ्यासक्रम पूर्णकालीन तर काही अंशकालीन आहेत.
प्रकाशकांना हवी तज्ज्ञांची गरजप्रकाशकांना वेगवेगळ्या विषयांची पुस्तके/ग्रंथांच्या अनुवादासाठी तज्ज्ञांची गरज भासते. अनुवादित साहित्यनिर्मिती आपल्याकडे मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशाप्रकारे उत्तम साहित्याचा अनुवाद करण्याची संधीही अनुवाद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते. न्यायालयीन कामकाजाच्या अनुवादासाठी तज्ज्ञ अनुवादकांची गरज भासते. त्यावेळी उत्तम अनुवादकांना संधी उपलब्ध होऊ शकते. आयात-निर्यात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना अनुवादकांची गरज भासते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्यालयात तसेच तत्सम कार्यालयांमध्ये इंग्रजी, फ्रेंच, अरेबिक, रशियन, चिनी/ स्पॅनिश या भाषांमधील अनुवादक हवे असतात. दिल्लीस्थित इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर या संस्थेला तांत्रिक विषयातील कागदपत्रांच्या अनुवादकांची गरज भासते.
अभ्यासक्रम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन, डिप्लोमा इन कमर्शियल ॲन्ड टेक्निकल ट्रान्सलेशन ॲण्ड टुरिझम इन जर्मन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन, एम.ए. इन ट्रान्सलेशन थिअरी ॲन्ड ॲप्लिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन इन हिंदी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन (हिंदी, इंग्रजी), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन स्टडीज इन हिंदी.
करिअर संधी
- अनुवादकांना प्रारंभी एखाद्या जाहिरात संस्थेत जाहिरातीच्या अनुवादाची संधी मिळू शकते. सर्व मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती देशातील प्रमुख भाषांमध्ये प्रकाशित होतात. त्यामुळे त्या विशिष्ट भाषेतील अनुवादकांची गरजही कॉर्पोरेट जगताला नेहमीच भासत असते.
- राष्ट्रीय पातळीवरील राजकीय संस्था, मोठ्या सामाजिक संस्था यांच्याही जाहिराती आणि निवदने प्रमुख भाषांमध्ये प्रकाशित होतात. त्यांनाही अनुवादकांची गरज भासते. विविध वेबसाइटवर वेगवेगळ्या भाषेत लिखाण करण्यासाठी अनुवादक लागतात.
- पर्यटन कंपन्या, मोठी हॉटेल्स, विविध देशांचे दूतावास, बहुराष्ट्रीय कंपन्या, कार्पोरेट हाऊसेस यांनाही अनुवादकांची गरज भासते. भाषेवरील प्रभूत्वासोबत माहिती तंत्रज्ञानातील कौशल्य संपादन केले तर सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये उत्तम संधी मिळू शकते. केंद्र सरकारच्या काही विभागांनाही कनिष्ठ आणि वरिष्ठ पातळीवरील अनुवादकांची आवश्यकता भासत असते.