जळगाव : कोरोनाच्या दोन वर्षांत वैद्यकीय व्यवसायाचे मोल आणखी वाढले. पूर्वी डीएड करून शिक्षिका होण्याकडे मुलींचा सर्वाधिक कल होता. तो सद्य:स्थितीत नर्सिंगच्या करिअरकडे वळला आहे. सध्या शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे शिवाय पगारही पाच आकडी असल्याने कुटुंबाचा आधार म्हणून नर्सिंगकडे करिअर म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
आता नर्सिंगमध्ये स्पेशलायझेशन अन् पीएचडीही...सद्य:स्थितीत कोणत्याही शाखेत शिक्षण घेतले तरी नोकरी लागेल याची शाश्वती नाही; परंतु नर्सिंगचे शिक्षण घेतले की शासकीय, खाजगी रुग्णालयात नोकरी लागण्याची संधी आहे, तसेच नर्सिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेऊन अनेक जण स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील करीत आहेत. कोरोनाच्या काळात सर्वत्र नर्सिंग कर्मचाऱ्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवली. अनेक जण आता नर्सिंगचे पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. नर्सिंगमध्येही स्पेशलायझेशन केलेल्यांना देशाबरोबरच परदेशातही नोकरीची संधी आहे.
नर्सिंगकडे कल वाढल्याची कारणे...- शासकीय आणि खाजगी रुग्णालयात नोकरीची संधी- सर्वच वैद्यकीय शाखांचे व प्रकारचे कोर्स उपलब्ध- नर्सिंगमध्ये पदवी प्राप्त करून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते- भविष्यात पदव्युत्तर शिक्षण व पीचडी करण्याची संधी- स्पेशलायझेशन कोर्स केल्यावर परदेशात नोकरीची संधी
आता दोन ते तीन वर्षांचे कोर्सेस...जळगाव मनपा हद्दीत मनपा रुग्णालयांसह दीडशेहून अधिक छोटी- मोठी रुग्णालये आहेत. त्यामुळे नर्सिंग कोर्स केलेल्या महिलांना तातडीने नोकरी मिळत आहे. शिवाय प्रशिक्षित नर्ससी कमतरता असल्याने सुरुवातीचे वेतनसुद्धा चांगले मिळत आहे. राज्यभरात नर्सिंगचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाचे प्रमाण कमी आहे. प्रशिक्षित नर्स व कर्मचारी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. पूर्वी नर्सिंग केवळ तीन ते सहा महिन्यांचे जुजबी कोर्स होते; अन्यथा एखाद्या हॉस्पिटलमध्ये अनुभवातून शिकावे लागत होते. आता दोन व तीन वर्षांचे नर्सिंग कोर्स सुरू झाले आहेत. त्यामुळे डॉक्टरांप्रमाणेच नर्सिंगमध्येही कर्मचाऱ्यांना स्पेशलायझेशन करता येत आहे.