नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होताना पाहायला मिळत आहे. यातच सरकारी विभागांमध्येही विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. यातच आता केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे इंफोर्समेंट ऑफिसर (Enforcement Officer) आणि अकाऊंट ऑफिसर (Account Officer) या पदांसाठी भरती केली जात आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे इंफोर्समेंट ऑफिसर आणि अकाऊंट ऑफिसर या पदांसाठी डीएएफमध्ये (Detailed Application Form) अर्जांसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इपीएफओमध्ये एकूण ४२१ पदांची भरती केली जाणार असून, या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे. ही अर्ज प्रक्रिया ०२ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, २२ नोव्हेंबरपर्यंत यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे.
आयोगातर्फे अद्याप परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसेच फी जमा करण्यासाठीही हीच शेवटची तारीख आहे. आयोगातर्फे अद्याप परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या What's New पर्यायावर जा. DAF: 'इन्फोर्समेंट ऑफिसर - अकाऊंट ऑफिसर, EPFO च्या ४२१ जागा' या लिंकवर क्लिक करा.मागितलेली माहिती भरुन नोंदणी पूर्ण करा. नोंदणी केल्यानंतर अर्ज भरा. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या.
जागांचा तपशील आणि निवड प्रक्रिया
इंफोर्समेंट ऑफिसर आणि अकाऊंट ऑफिसर पदाच्या ४२१ जागांपैकी सर्वसाधारण श्रेणीसाठी १६८ जागा, ओबीसीसाठी ११६ जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS प्रवर्गासाठी ४२ जागा, एससीआणि एसटी श्रेणीसाठी ३३ जागा आहेत. अर्जदारांना लेखी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवडलेल्या उमेदवारांना रोजगार भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कामगार व रोजगार मंत्रालयामध्ये इन्फोर्समेंट ऑफिसर किंवा अकाऊंट ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाईल. भरती चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांसाठी ७५:२५ असे वेटेज असणार आहे, असे सांगितले जात आहे.