जागतिक स्तरावर सध्या कॉस्ट कटिंग हा शब्द जिकडे-तिकडे कानावर पडू लागला आहे. नामांकित कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना अचानक नारळ दिला आहे. त्यामुळे आपली नोकरी जाऊ नये आणि कंपनीसाठी आपण कसे अधिकाधिक उपयुक्त आहोत, हे पटवून देण्यासाठी सारे जण प्रयत्न करू लागले आहेत. आधी घेतलेल्या शिक्षणाला लोक अधिक कौशल्यांची जोड देत आहेत.
दिवसाला १ ते ३ तास कोर्ससाठी आयटी, बँकिंग, वित्तीयसेवा, विमासेवा, हेल्थ केअर आणि फार्मा आदी क्षेत्रातील कर्मचारी अधिकची कौशल्ये शिकण्यासाठी धडपडत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची कंपनीतील उपयुक्तता वाढली आहे, तसेच कंपन्यांची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही यामुळे पूर्ण होत आहे. अपस्किलिंग करणारे कर्मचारी या शिक्षणासाठी दिवसातील १ ते ३ तास देताना दिसत आहेत. सायबर सिक्युरिटी या विषयात शिक्षण घेण्याची तयारी दाखविणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटांतील कर्मचारी होते.
प्रमोशन आणि पगारवाढही पियर्सन स्किल्स आउटलूक अहवालानुसार ८८ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना असे वाटते की, स्वत:चे ज्ञान अपडेट करणे आणि कंपन्यांसाठी असलेली आपली उपयुक्तता कायम राखण्यासाठी अपस्किलिंग करणे अर्थात, शिक्षण-प्रशिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षात अपस्किलिंगमुळे ४३ टक्के कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांमध्ये वेतनामध्ये चांगली वाढ मिळाली. १८ टक्के कर्मचाऱ्यांना अपस्किलिंगनंतर आणखी चांगली नोकरी मिळाली.
कोणत्या कोर्सेसना पसंती? अपस्किलिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे प्रमाणित अभ्यासक्रमात ऑनलाइन प्रवेश देणाऱ्या संस्थांची संख्या वाढली आहे.
मागच्या वर्षात डेटा सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची पसंती नोकरीला सुरुवात करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दाखविली. २०२२ या वर्षात कमीत कमी ८ वर्षे अनुभव असलेल्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांनी पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेला दिसला.