तांत्रिक किंवा अतांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी कायमच विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साह असतो. मात्र, कुठल्याही शाखांमध्ये प्रवेश घेताना सद्यस्थितीतील करिअरच्या संधी, त्या क्षेत्राची व्यापकता, व्यवहार्यता आणि भविष्यातील दिशा यांचा विचार करणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्राची निवड करताना केवळ चौकटीतील ठोकताळ्यांवर विश्वास न ठेवता चारही बाजूंनी विचार करणे अत्यावश्यक आहे.
शाखा वा क्षेत्राबाबत समजून घ्या
बऱ्याचदा विद्यार्थी हे परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करतात. जेणेकरून परीक्षेत चांगले गुण मिळविता येतील. मात्र, ही बाब पुरेशी नाही. कारण सध्या मार्केट आणि इंडस्ट्रीची गरज पाहता थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला अधिक महत्त्व आले आहे. अभ्यासक्रमाचा व्यावहारिक द़ृष्टिकोनातून विषय समजून घेतला पाहिजे.
उद्योगक्षेत्रात महत्त्व जाणून घ्या
ज्या अभ्यासाच्या जोरावर इंडस्ट्रीत प्रवेश करणार आहेात, तेथील बदलाचा कानोसा घेणे क्रमप्राप्त ठरते. जर महाविद्यालय वा शैक्षणिक संस्थांकडून इंडस्ट्रीशी सातत्याने संवाद होत असेल आणि इंडस्ट्रीतील लोक नियमित कॉलेजमध्ये येत असतील तर ही बाब चांगली आहे.
केवळ थिअरी नको
शैक्षणिक वर्षात केवळ थिअरी म्हणजेच पाठ्यपुस्तकांतील अभ्यासावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करण्यावर सुरुवातीपासून भर द्यावा, म्हणजे भविष्यातील धोक्यांची समज येते. शिकावू वृत्तीने प्रशिक्षण पूर्ण करण्यावर भर द्यावा.
क्षेत्रातील बदलांना जाणा
केवळ उद्योगाच्या बदलत्या गरजांना समजून त्याप्रमाणे आपणही कात टाकायला तयार असले पाहिजे. जेणेकरून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी भटकंती करावी लागणार नाही. त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसेल.