लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहा दिवस गणरायाची आराधना केल्यानंतर गुरूवारी चंद्रपुरात ढोलताश्यांच्या गजरात विसर्जन होणार आहे. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ५० पोलीस उपनिरीक्षकांसह १ हजार पोलिसांचा ताफा नियुक्त करण्यात आला आहे. गणेश भक्तांना महाप्रसाद, पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यासाठी शहरातील विविध धार्मिक व सामाजिक संघटनांनी तयारी पूर्ण केली. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी बुधवारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मुख्य मार्गावर सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्यात आले. बल्लारपूर व वरोरा शहरातही आज मोठ्या उत्साहात बाप्पाचे विसर्जन होणार आहे.विर्सजनाच्या मिरवणुकीदरम्यान उपद्रवी मंडळी, समाजकंटक आणि गुन्हेगारांनी डोके वर काढू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच प्रतिबंधक कारवाई केली. शहरातील मुख्य मार्ग नियमित वर्दळीसाठी बंद ठेवून अन्य मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. यासाठी आज अनेक ठिकाणी कठडे लावण्यात आले.गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सावरकर चौक, बसस्थानक चौक, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक, पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट मार्ग, प्रियदर्शिनी चौक ते जुना वरोरा नाका हा रस्ता वाहनांसाठी बंद राहील. नागपूरकडून येणारी आणि बल्लारपूर, मूलकडे जाणारी सर्व वाहने वरोरा नाका उड्डाण पुलावरून सावरकर चौक ते बंगाली कॅम्पमार्गे मूल आणि बल्लारपूरकडे रवाना होतील. मूल व बल्लारपूरकडून येणारी तसेच नागपूरकडे जाणारी वाहने बंगाली कॅम्प, सावरकर चौकातून उड्डाणपूलावरून नागपूर मार्गाने पुढे जाण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य वर्दळीच्या चौकात आज सायंकाळी बॅरिकेटस् ठेवण्यात आले. मिरवणुकीदरम्यान वादविवाद गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर ठाणे, रामनगर व दुर्गापूर येथील ठाणेदार त्यांच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकांऱ्याच्या संपर्कात असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला. ढोलताशा पथकांमुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.पावसामुळे आनंदावर विरजनशहरातील रामाळा तलावात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन केल्या जाणार आहे. शिवाय घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली. तलावर बोट व वॉच टॉवरची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. चंद्रपुरातील गणेश मंडळांकडून दरवर्षी आकर्षक व प्रबोधनपर देखावे तयार केल्या जातात. परंतु, बुधवारी दुपारी २ वाजतापासून पाऊस सुरू झाल्याने कार्यकर्ते व नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले.
बाप्पाच्या निरोपासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:00 AM
विर्सजनाच्या मिरवणुकीदरम्यान उपद्रवी मंडळी, समाजकंटक आणि गुन्हेगारांनी डोके वर काढू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच प्रतिबंधक कारवाई केली. शहरातील मुख्य मार्ग नियमित वर्दळीसाठी बंद ठेवून अन्य मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. यासाठी आज अनेक ठिकाणी कठडे लावण्यात आले.
ठळक मुद्देबंदोबस्तासाठी एक हजार पोलिसांचा ताफा तैनात : मुख्य मार्गावर उभारले टॉवर, मिरवणुकीवर सीसीटीव्ही वॉच