चंद्रपूर : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा ८५ वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृह मतदान करणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे. मागील चार दिवसांमध्ये १ हजार १८५ जणांनी गृह मतदान केले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनात ८ एप्रिलपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. आतापर्यंत चार दिवसांत एकूण १ हजार १८५ मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपले मत नोंदविले. यात १ हजार २५ मतदार ८५ वर्षांवरील तर १६० मतदार दिव्यांग आहेत.
विधानसभानिहाय गृह मतदानाची संख्याराजुरा ३३१
चंद्रपूर १८२बल्लारपूर २४२
वरोरा २३९वणी १०६
आर्णी ८५
अशी पाळण्यात आली गोपनीयतागृह मतदान करताना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म १३ - ए (डिक्लेरेशन), फॉर्म १३ - बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म १३ - सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म १३ - डी (मतदान कसे करायचे याबाबत सूचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करताना कोणतीही दुसरी व्यक्ती त्यांच्या जवळपास नव्हती. मतपत्रिका घडी केल्यानंतर मतपत्रिका छोट्या लिफाफ्यामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.
मी पूर्णपणे दिव्यांग आहे. स्वत:च्या पायावर किंवा कशाच्याही आधाराने उभी राहू शकत नाही. त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊ शकत नव्हती. प्रशासनाने घरी येऊन मत नोंदविले, याचा अतिशय आनंद आहे.-सुरेखा तुकाराम राठोड, महाराजगुडाकोट
मतदानासाठी लोक घरी आले. आम्ही म्हटले, बापू मतदानासाठी आम्हाले मतदान केंद्रावर जाता येत नाही. त्यांनी घरी येऊन आमच्या दोघांचे मत घेतले. आम्हाला आनंद झाला.-संग्राम कोरपल्लीवार, नारपठार (विजयगुडा)
माझे वय ९०च्या वर असून, आज घरून मतदान केले, याचा अतिशय आनंद झाला. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.-- अनंत देवीदास कावळेशिवछत्रपतीनगर, चंद्रपूर