चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ जुनोना चौकात राहणाऱ्या एका अवैध सावकाराकडून गरजूंची आर्थिक लूट करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून सहकार व पोलिस विभागाने धाड टाकून १० बँक पासबुक, ९८ कोरे स्टॅम्प पेपरसह विविध आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले. दरम्यान, जप्त केलेल्या आक्षेपार्ह कागदपत्रांतून लुटीचे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर, रा. जुनोका चौक, बाबूपेठ चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
राज्य शासनाच्या सावकारी अधिनियम अन्वये अवैध सावकारी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. अधिकृत सावकारी करायचीच असेल तर त्यासाठी या अधिनियमाच्या चौकटीतून परवाना काढावा लागतो. कोरोनाकाळात पराकोटीची आर्थिक विषमता निर्माण झाल्याने अवैध सावकारी जोरात सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, जिल्हा निबंधक कार्यालयाने गांभीऱ्याने लक्ष घातल्याने अवैध सावकारीने डोके वर काढले नव्हते. काही दिवसांपूर्वी जुनोना चौकातील गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर नावाचा एक व्यक्ती अवैध सावकारी करीत असल्याची माहिती सहकार विभागाला मिळाली. शिवाय, अवैध सावकारीसंदर्भात तक्रारीही प्राप्त झाल्या. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशान्वये, सहकार विभाग व पोलिसांनी चंद्रपूरचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक एस. एस. तुपट, बल्लारपूरचे एम.डी. मेश्राम, सहकार खात्यातील कर्मचारी यांच्या पथकाने आरोपी गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर याच्या घरावर गुरुवारी १२ जानेवारी २०२३ रोजी धाड टाकली.
या धाडीत अवैध सावकारीशी संबंधित अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या मार्गदर्शनातील कारवाई पथकात सहायक निबंधक एस. एस. तुपट यांच्यासह सहायक निबंधक सहकारी संस्था बल्लारपूरचे एम.डी. मेश्राम, सहकार अधिकारी एस. के. बगडे, प्रशांत गाडे, जाधव, भोयर, सरपाते, गौरखेडे, सिडाम, दरणे आदींचा समावेश होता.
पुन्हा काय होते ‘त्या’ सावकाराच्या घरात ?
पथकाने आक्षेपार्ह कागदपत्रांचा शोध घेतला असता काही लिहिलेले व कोरे असे ९८ स्टॅम्प पेपर, ११२ कोरे धनादेश, रेव्हेन्यू तिकीट लावलेल्या सहा पावत्या, रकमेच्या नोंदी असलेले चार रजिस्टर, १० बँक पासबुक, तसेच अनेक व्यक्तीच्या नावे असलेले मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, इतर विक्रीपत्र व मालमत्ता पत्र आदी कागदपत्रे आढळली. ही सर्व कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. कागदपत्रांच्या चौकशीनंतर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती निबंधक एस. एस. तुपट यांनी दिली.
जिल्ह्यात २५४ व्यक्तींनाच सावकारीचा परवाना
राज्य शासनाच्या नियमांच्या चौकटीत राहून जिल्ह्यातील काहींनी अर्ज केल्याने पात्र व्यक्तींना सावकारीचा परवाना देण्यात आला. जिल्ह्यात अधिकृत सावकारांची संख्या २५४ एवढी आहे. याच व्यक्तींनाच नियमांच्या अधिन राहून सावकारी करता येते. याव्यक्तिरिक्त कुणीही असा व्यवसाय केल्यास गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कायद्यानुसार शिक्षा होते.
पीडितांनी तक्रारीसाठी पुढे यावे
बेकायदेशीर सावकारी करणे गुन्हा आहे. अशी प्रकरणे जिल्ह्यात घडली असतील तर संबंधितांनी कुणाच्याही दबावात न येता पुढे येऊन तक्रार दाखल करावी, सहकार विभाग नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे.
- प्रशांत धोटे, जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूर