राजुरा : कोरोना संकट काळात ऑक्सिजनच्या तुटवड्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र असताना राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेची वस्तुस्थिती राजुरा तालुक्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या लक्षात आणून देताच, अहिर यांनी वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या माध्यमातून राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कुळमेथे व त्यांच्या वैद्यकीय चमूला १० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले.
यावेळी माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, वाघुजी गेडाम, सतीश धोटे, प्रशांत घरोटे, सचिन डोहे, कैलाश कार्लेकर, प्रशांत साळवे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोना संसर्गाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सेवाभावनेने रुग्ण व त्यांच्या परिवाराची काळजी घ्यावी. कुठल्याही रुग्णालयात कुठलीही कमतरता अथवा रुग्ण सेवेची गरज असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी हंसराज अहिर यांनी केले.