साईनाथ कुचनकार/ चंद्रपूरचंद्रपूर : नोटा अर्थात ‘नन ऑफ द अबोव्ह’. एखाद्या मतदाराला निवडणूक लढवत असलेला एकही उमेदवार प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र नाही, असं वाटत असेल, तर तो ‘नोटा’ला मतदान करतो. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील १० हजार ८८३ मतदारांना निवडणूक रिंगणात असलेल्या १५ उमेदवारांपैकी एकही आवडले नाही. त्यामुळे त्यांनी नोटाला मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र रामटेके, जनसेवा गोंडवाना पार्टी अवचित सयाम, ‘जविपा’चे अशोक राठोड, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव शेडमाके, ‘बीआरएस’पी पोर्णिमा घोनमाडे, अभामाप वनिता राऊत, सन्मान राजकीय पक्षाचे विकास लसंते, भीम सेना विद्यासागर कासर्लावार, पीपीआयडी सेवकदास बरके, तर अपक्ष म्हणून दिवाकर उराडे, मिलिंद दहिवडे, संजय गावंडे हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, यातील एकही उमेदवार पसंत नसल्याचे लोकसभा क्षेत्रातील १० हजार ८४३ मतदारांना वाटले असून, त्यांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.
विशेष म्हणजे, राजुरा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक २ हजार १३८, चंद्रपूर १ हजार ३८५, बल्लारपूर १ हजार ८९६, वरोरा २ हजार ७, वणी १ हजार ७१९, आर्णी १ हजार ६७६ मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे.
विधानसभानिहाय ‘नोटा’ला पसंतीराजुरा-२३३८चंद्रपूर-१३८५बल्लारपूर-१८९६वरोरा-२००७वणी-१७१९आर्णी-१६७६
२२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही नाकारले उमेदवार
निवडणूक रिंगणातील उमेदवार प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र नाही, असे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाटते. त्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे ‘नोटा’वर मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील एकूण मतदार- १८,३६,३१४मतदानाचा हक्क बजावलेले मतदार- १२,४१,८२८