सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा : ३.२० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजनचंद्रपूर : शहरालगतच्या उर्जानगर कॉलनीच्या संपूर्ण विकासासाठी १०० कोटींचा आराखडा तयार केला जात आहे. त्यापेक्षा अधिक निधीची गरज भासल्यास आखणीही तरतूद केली जाईल. त्याद्वारे उर्जानगर कॉलनी राज्यातील उत्तम कॉलनी म्हणून नावारूपास आणू, असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी ३ कोटी २० लाख रुपयांच्या ११ विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यादरम्यान, उर्जानगर कॉलनीतील स्नेहबंध सभागृहाचे नूतनीकरण व रस्ता डांबरीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महाऔष्णिक केद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम चौखे, दुगार्पूरच्या सरपंच लिना चिमूरकर उपस्थित होत्या. ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते ठिकठिकाणी झालेल्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी पंचायत समिती सभापती बंडू माकोडे, जिल्हा परिषद सदस्य ब्रीजभूषण पाझारे, रामपालसिंह, भटाळीच्या सरपंचा मनिषा थेरे आदी उपस्थित होते.उर्जानगर कॉलनीतील स्नेहबंध सभागृहाचे ८४.५६ लाख रुपये खर्च करुन नूतनीकरण करण्यात येत आहे. तसेच वसाहतीत रस्त्याचे बांधकामही होत आहे. सदर वसाहत राज्यातील सर्वोत्कृष्ट बनवू. ही वसाहत पाहून इतर ठिकाणावरील कर्मचारी चंद्रपूर येथे बदली मागतील, इतकी सुंदर ही वसाहत असेल. आराखडयाचे काम लवकरच पूर्ण होत आहे. १०० कोटींच्या विकास आराखडयाचे नियोजन आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.भटाळी येथे हॅन्डवॉश स्टेशन तसेच आरोग्य उपकेद्राचे नूतनीकरण व स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजनही त्यांनी केले. यावेळी बोलतांना कोळसा खाणीमुळे निर्माण झालेल्या गावाच्या समस्या विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र बैठक घेवून सोडविण्याचे आश्वासन दिले. खाणीमध्ये जमिनी गेलेल्या कुटुंबातील युवकांना नोकऱ्या, भटाळीचे पुनर्वसन आणि शिल्लक असलेला मोबदला याबाबी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विविध विकास कामांना सुरुवातना. मुनगंटीवार यांच्या हस्ते बियाणी नगर येथील सिमेंट क्रॉकीट रोड, उर्जानगर वार्ड क्र. १ येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, नाली व रोड तसेच अंगणवाडी संरक्षण भिंतीचे बांधकाम, उर्जानगर वार्ड क्र. ६ येथे डांबरीकरण, नेरी वार्ड क्र. ५ येथे बौध्द विहाराची संरक्षण भिंत बांधणे, दुगार्पूर वार्ड क्र. ५ येथे आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, वार्ड क्र. २ मध्ये नाली बांधकाम, किटाळी येथे रोड व नालीचे बांधकाम, भटाळी येथे स्मशानभूमी रोड व आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, चांदसुर्ला येथे रोड व नालीचे बांधकाम, उर्जानगर वसाहतीत रस्त्याचे डांबरीकरण व सभागृहाचे नूतनीकरण आदींचे भूमिपूजन करण्यात आले.
उर्जानगर कॉलनीच्या विकासासाठी १०० कोटींचा आराखडा
By admin | Published: October 02, 2016 12:48 AM