लसीकरणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
रवी जवळे
चंद्रपूर : कोरोनावरील लस जानेवारी महिन्यात येणार असल्याच्या अंदाज आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. लस आलीच तर ती सर्वप्रथम आरोग्यसेवेतील १५ हजार ७०० लोकांना दिली जाणार आहे. ही लस साठवणूक करण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. जवळपास दोन लाख लस सुखरूप ठेवता येणार आहे. याची क्षमता १० हजार लिटर आहे.
कोरोना संसर्गात सर्वप्रथम आरोग्यसेवा मजबुत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नरत आहे. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, टेक्नीशियन, आरोग्यसेवेतील वाहनचालक, अंगणवाडी सेविका, खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे.
बॉक्स
शितगृहाची व्यवस्था
कोविड-१९ या विषाणूवरील लस ० ते ८ डिग्री सेल्सीयस तापमानातच ठेवावी लागते. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे रेफ्रीजरेटर आरोग्य विभागाने खरेदी केले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शितगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बॉक्स
लस ठेवण्याचे जिल्ह्यात ७८ ठिकाण
कोरोनावरील लस जिल्ह्यात उपलब्ध झालीच तर ती ठेवण्यासाठी जिल्ह्यात ७८ शितगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील सात गृहे मनपा हद्दीत असतील. १३ उपजिल्हा रुग्णलयाच्या ठिकाणीदेखील लस ठेवता येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील तळागाळापर्यंतच्या नागरिकांना लस मिळावी म्हणून जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातही ही लस ठेवण्यासाठी शितगृहे सज्ज केली आहेत.
बॉक्स
लस पोहचविण्यासाठी ७२ गाड्या
आरोग्य विभागाकडे एक वॅक्सीन वाहन आहे. या वाहनाने नागपूरवरून लस जिल्ह्यात आणल्या जाणार आहे. त्यानंतर याच वाहनाने उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचविली जाणार आहे. १३ उपजिल्हा रुग्णालय व ५८ पीएचसीच्या रुग्णवाहिकांनी मग लस ठिकठिकाणी पाठविली जाणार आहे. म्हणजेच एक वॅक्सीन वाहन आणि ७१ रुग्णवाहिका लस पोहचविण्यासाठी कामी लागणार आहे.