चंद्रपूर : लंडन येथे कायद्याचे शिक्षण पूर्ण करून भारतात परतलेल्या ॲड. दीपक चटप यांनी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांतील तब्बल १०६ महाविद्यालयांतील २७ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून उच्च शिक्षणाचा जागर केला. शिक्षणयात्रेच्या माध्यमातून त्यांनी तिन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचून देश-विदेशांतील पदव्युत्तर शिक्षणातील संधी, शिष्यवृत्ती, फेलोशिपबाबतची माहिती आणि आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार असून, यातील नक्कीच काही विद्यार्थी देशविदेशांत शिक्षणासाठी जातील, असा विश्वास ॲड. दीपक चटप यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद शाळा, लखमापूर ते एसओएएस युनिव्हर्सिटी ऑफ लंडन असा प्रवास करणारा अवघ्या २६ वर्षीय ॲड. दीपक हेमलता यादवराव चटप यांना ब्रिटिश सरकारमार्फत देण्यात येणारी जागतिक प्रतिष्ठेची शेवनिंग शिष्यवृत्ती मिळाली. लंडन येथून परतल्यानंतर लगेच त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जागृत संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणयात्रा काढून मार्गदर्शन केले. मागील दोन महिन्यांमध्ये तब्बल १०६ महाविद्यालयांतून २७ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही शिक्षणयात्रा पोहोचली. यासाठी डॉ. पंकज नरुले, श्रीकांत एकोडे, नीलेश नन्नावरे, संदीप गोहोकार, पवन मोटघरे, वैभव अडवे, प्रतीक पानघाटे आदींचे सहकार्य लाभले.संविधान दिनापासून सुरू केली यात्राशिक्षण संधीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी ‘शिक्षणयात्रा : एज्युकेशन टू एम्पॉवरमेंट’ हा कृतियुक्त कार्यक्रम ॲड. दीपकने हाती घेतला. २६ नोव्हेंबर २०२३ संविधान दिनापासून तर पुढील दोन महिन्यांच्या काळात चंद्रपूर-गडचिरोली-यवतमाळसह विदर्भातील १२वी पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत पोहोचून देश-विदेशांत पदव्युत्तर शिक्षणातील संधी, शिष्यवृत्ती, फेलोशिपबाबतची माहिती आणि आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांनी शिक्षणयात्रेचे समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.याबाबत मार्गदर्शनदेशातील नामांकित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, अझीम प्रेमजी विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली, दिल्ली विद्यापीठ, अशोका विद्यापीठ, शिव नादर विद्यापीठ, इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मनेजमेंट आदी विद्यापीठे व गांधी फेलोशिप, युथ फॉर इंडिया फेलोशिप, टीच फॉर इंडिया फेलोशिप, आदी फेलोशिपसह विविध संधी व त्यांची तयारी यावरही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.