दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. त्यामुळे पालकांसह शिक्षकांमध्ये यावरून चर्चांना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात दहावीची १८ हजार ६९० मुले तर १६ हजार ३९१ मुली असे एकूण ३५ हजार ८१ विद्यार्थी तर बारावीमध्ये १४ हजार ५४७ मुले आणि १४ हजार २४२ मुली अशी २८,७८९ विद्यार्थी संख्या आहे. ऑफलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनच परीक्षा द्यावी लागणार आहे. शहरी विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरातीलच केंद्रावर तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी पालक आपले मत व्यक्त करीत आहेत. काही पालकांना परीक्षा ऑफलाइन तर काहींना ऑनलाइन परीक्षा घ्यावी, असे वाटत आहे. मात्र काही पालक संकटावर मात करून मंडळाने ऑफलाइनच परीक्षा घ्यावी, यावर ठाम आहेत.
परीक्षेचे वेळापत्रक
दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे
विद्यार्थी संख्या
दहावी - ३५,०८१
बारावी - २८,७८९
प्रतिक्रिया
कोट
दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे परीक्षा होणे गरजेचे आहे. मात्र कोरोना संकटामुळे पालकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचे नियम काटेकोर पाळून ऑफलाइन परीक्षा घेण्यात काहीही हरकत नाही.
- नारायण सावे, चंद्रपूर
--
दरवर्षी विद्यार्थी शाळेत जाऊन अभ्यास करायचे, या वर्षी अजूनही पूर्णपणे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा सराव झाला नाही. तरीही विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करीत आहेत. आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांनी अधिकाधिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे लक्ष देऊन ऑफलाइन परीक्षा घ्यावी.
- नामदेव लचके
चंद्रपूर
-
विद्यार्थ्यांच्या भविष्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संकटावर मात करून कोरोनाचे नियम पाळून परीक्षा घ्यावी. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल.
- मीरा ससनकर, चंद्रपूर
--
बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
प्रत्येक वर्षी परीक्षा काळात काही ना काही संकट येतेच. त्यामुळे न घाबरता विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. बारावीचे विद्यार्थी मोठे असतात. त्यांना आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही.
- अरुण नहाले
-
आरोग्यासंदर्भात बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. कोरोना संकट काळात परीक्षा असली तरी विद्यार्थी न डगमगता परीक्षा देणार आहेत. यामध्ये पालकांना चिंता वाटणे स्वाभाविकच आहे. मात्र मंडळाने जाहीर केलेला निर्णय योग्यच आहे.
- मीना आत्राम
चंद्रपूर
--
मागील काही दिवसांत कोरोना संकटाने डोके वर काढले आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी शासनस्तरावर तसे प्रयत्न केले जात आहेत. असे असताना ऑफलाइन परीक्षा घेऊन शाळांमध्ये गर्दी न वाढविता परीक्षा ऑनलाइन घ्यावी.
- प्रकाश खाडे, चंद्रपूर