राजुरा : राजुरा तालुक्यातील महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील लक्कडकोट वन उपज तपासणी नाक्यावर एका कारमधून दीड लाखाचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार झाला असून राजुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तेलंगणाकडून मारुती कार (क्रमांक एमएच ११ / एके ७३१८) लक्कडकोट नाक्यावर थांबवून या कारची तपासणी केली असता त्यात ४१ किलो १८० ग्रॅम ओलसर गांजा आढळला. या गांजाची किंमत एक लाख ६४ हजार ७२० रुपये असून कारसह एकूण ११ लाख ७४ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजुरा पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम २० व २२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी वाहन चालक दिनेश निपेन दास रा.साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. दुसरा आरोपी सुनील हा फरार झाला. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे, उपनिरीक्षक सुनील झुरमुरे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे यांनी केली.