लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत होते. यातील ११ विद्यार्थी सुखरूप असून जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यासोबत प्रशासनाचा अजूनही संपर्क झाला नाही. विशेष म्हणजे, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत महेश भोयर याने संवाद साधला असून तो कोरपना येथील रहिवासी आहे.युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आणि वरोरा येथील आदिती सयारे हे नुकतेच घरी पोहचले आहेत. दरम्यान, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही चिमूर येथील विद्यार्थिनी बुखारेस्ट (रोमानिया) एअरपोर्टवर आली आहे. नेहा शेख भद्रावती ही पोलंड येथे पोहचली आहे. चंद्रपूर येथील धीरज बिश्वास हा विद्यार्थी रोमानिया येथे आहे. चंद्रपुरातील दीक्षराज अकेला आणि कोरपना येथील महेश भोयर हे रोमानिया येथील बाॅर्डवरून एअरपोर्टकडे रवाना झाले आहेत. ब्रह्मपुरी येथील महेश उके याने हॅग्नी बाॅर्डर ओलांडल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे हे सर्व सुखरूप असून कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र बल्लारपूर येथील भोयर नामक विद्यार्थ्यांचा संपर्क झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यासोबत संपर्क साधण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे.
महेश चालला २० कि.मी. पायीकोरपना येथील महेश विलास भोयर हा विद्यार्थी युक्रेनमधील इवानो विद्यापीठात शिक्षण घेत आहे. मात्र युद्ध सुरू झाले आहे आणि त्याला मायभूमीत केव्हा येतो, याची चिंता सतावत होती. विद्यापीठातून आठ तास बसने प्रवास करत रोमानिया-युक्रेन बाॅर्डर गाठले. त्यानंतर २० किमी पायी प्रवास करत रोमानियात तो दाखल झाला. येथून रोमानियाची राजधानी बुखारीपर्यंत पाचशे कि.मी.चा प्रवास करून तीन दिवसांपूर्वीच बुखारीस विमानतळ त्याने गाठले. तेथील एका समाजसेवी संस्थेतर्फे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तीन दिवसानंतर बुधवार २ मार्चला सायंकाळी ६ वाजता बुखारीस येथून विमानाने तो मायदेशी परतला आहे. तो दिल्ली विमानतळावर येणार आहे. महेश हा भारतातून ३० नोव्हेंबरला गेला होता.