जिवती तालुक्यात सर्वाधिक : १३ वर्षांपासून होते शिक्षक कार्यरतचंद्र्रपूर : ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील वस्ती, पाडे, तांड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने १३ वर्षापूर्वी निमशिक्षकांची नेमणूक करून येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. मात्र ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक घडवित आहे. त्या शिक्षकांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत होते. त्यामुळे निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा द्यावा, अशी मागणी या शिक्षकांची होती. या शिक्षकांची मागणी शासनाने मान्य केली असून जिल्ह्यातील तब्बल १११ निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे निमशिक्षकांमध्ये आंनदाचे वातावरण असून यापुढेही आपली सेवा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देणार असल्याचे शिक्षकांनी मत व्यक्त केले आहे.सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यानुसार ग्रामीण भागात तसेच तांडे, वस्ती, पाड्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निमशीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक वस्ती, तांड्यामध्ये पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शासनाला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे शासनाने मानधन देवून निमशिक्षकांच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरु केले. मात्र या शिक्षकांना केवळ ३ ते ४ हजार रुपये मानधनावर काम करावे लागत होते. त्यामुळे त्यांना आपले कुटुंब चालविणे कठिण झाले. शासकीय नियमानुसार या शिक्षकांना वेतन तथा भत्ते देण्यात येत नव्हेत. हलाखिच्या परिस्थितीत सदर शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आहे. त्यामुळे किमान प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देण्याची मागणी या शिक्षकांनी शासनाकडे रेटून धरली. शासनाने त्यांची मागणी आता मान्य केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १११ निमशिक्षकांना ‘अच्छे दिन’ आले आहे. (नगर प्रतिनिधी)
१११ निमशिक्षकांना आले ‘अच्छे दिन’
By admin | Published: June 25, 2014 12:21 AM