केसारा ग्रामपंचायतीतील प्रकार : माहितीच्या अधिकारात उघडआक्सापूर : पोंभुर्णा तालुक्यातील केमारा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या देवई येथे सन २०१०-१५ या काळात देण्यात आलेल्या ४० घरकुलापैकी चक्क १२ घरकुलाच्या लाभार्थ्यांना पूर्ण निधी दिली असे दाखवून ही रक्कम परस्पर ग्रामपंचायत सरपंच, सचिव व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून काढून घेतली, अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. गणपत जाधव कुळमेथे यांनी ही माहिती मागितली. केमारा येथील ग्रामसेवक व सरपंच हे ग्रामस्थांना रहिवासी दाखले, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र व गृहकर नमूना देण्यासाठी ५० ते २०० रुपये घेत असतात. जर गोरगरीब लोकांकडून प्रमाणपत्राला पावती न घेता ही रक्कम घेत आहेत, तर सरपंच, सचिव गावकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनेत काय करीत असेल अशी शंका आल्याने कुळमेथे यानी घरकूल, शौचालय बांधकाम गृहकर पाणीकर बाबतची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली. ही माहिती सचिव यांनी सरळ- सरळ न देता दोनदा अपिल केल्यानंतर केवळ सन २०१०-१५ या काळात देण्यात आलेल्या ४० घरकुलांपैकी १२ घरकुल धारक लाभार्थ्यांची माहिती दिली. घरकुलाची रक्कम न देता घरकुलाचे काम पूर्ण झाले असून अनुदानाची रक्कम देण्यात आल्याचा शेरा नोंदविण्यात आला. वास्तव्यास घरकुल न मिळाल्या लाभार्थ्यांमध्ये गणपत कुळमेथे, प्रल्हाद मडावी, परशुराम आलाम, हरिचंद्र कोवे, किरण कन्नाके, खुशाब बोडेकर, गोसाई आत्राम, श्वेंता आलाम, गोपाल आलाम, पांडूरंग नैताम, नंदकिशोर नैताम, सचिव पोरेते आदींना घरकुलाच्या अनुदानाची रक्कम पूर्ण देण्यात आली. अशी नोंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वास्तविकता त्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आलीच नाही. काहींना तर आपण घरकुलाचे लाभार्थी असल्याची माहिती सुद्धा नाही. या भोंगळ कारभाराची तक्रार आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती गणपत कुळमेथे यांनी दिली. (वार्ताहर) ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू असूृन या कारभाराची चौकशी करण्याची मागणी गणपत कुळमेथे यांनी केली आहे. चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कुळमेथे यांनी प्रशासनाला दिला आहे.
१२ घरकुलाच्या अनुदानाची रक्कम गहाळ
By admin | Published: May 28, 2015 12:04 AM