संरक्षण भिंत : अंतर्गत रस्त्याची कामे होणार चंद्रपूर : जिल्ह्यातील भिवकुंड येथे सुरू होणाऱ्या नवीन सैनिक शाळेच्या परिसराला संरक्षण भिंत व अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी १२ कोटी ३६ लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सचिवस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून मंजूर सदर सैनिकी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात नवीन सैनिकी शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र, गुजरात तथा गोवा क्षेत्राचे तत्कालीन लेफ्टनन जनरल आर.आर. निंभोरकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय मंत्री विनोद तावडे यांच्याशी सतत पत्रव्यवहार केला. त्यानंतर याबाबतचा ठराव विधानसभेत सादर करण्याबाबत ना. मुनगंटीवार यांनी आग्रह धरला. त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशीसुद्धा पत्रव्यवहार केला. परिणामी शालेय शिक्षण मंत्र्यांनी १० एप्रिल २०१५ रोजी विधानसभेत याबाबतचा ठराव मांडला आणि विधानसभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील ही सैनिकी शाळा राज्यातील दुसरी सैनिकी शाळा ठरणार आहे. पहिली सैनिकी शाळा सातारा येथे सुरू झाली. महाराष्ट्रात अशा पद्धतीची आणखी एक सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन व्हावी, यासाठी ना. मुनगंटीवार यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामध्ये ते यशस्वीही झाले. चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर विसापूर गावानजीक भिवकुंड येथे सुमारे १२२ एकर जागेवर ही शाळा उभारण्यात येणार आहे. ना. मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार या सैनिकी शाळेसाठी जागेची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र, गुजरात व गोवा क्षेत्राचे तत्कालीन लेफ्टनन जनरल आर.आर. निंभोरकर हे स्वत: चंद्रपुरात आले होते. त्यांनी ही जागा ठरविली आहे. राज्याचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करताना या सैनिकी शाळेसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे ना. मुनगंटीवार यांनी जाहीर केले. सैनिकी शिक्षण ही बाब केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित नाही, तर नागरी व सैन्यदलात कार्य करताना व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याची आणि करिअर करण्याची बाब आहे. सैनिकी शिक्षण हे शत्रुशी लढा देण्याइतकेच जितके महत्त्वाचे आहे तितकेच नागरी जीवनात वावरताना व देशाची सेवा करताना अत्यंत आवश्यक आहे. सैनिकी शिक्षणाची ही गरज लक्षात घेता ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात नवीन सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. (प्रतिनिधी)
सैनिकी शाळेसाठी १२ कोटी
By admin | Published: April 03, 2017 2:06 AM