प्रवीण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर) : शेतातील उत्पन्नात वाढ व्हावी, म्हणून शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात; परंतु यंदा रासायनिक खत देताना वरोरा तालुक्यातील माढेळी परिसरातील जळका, वडगाव, वंदली या गावांतील शेतकरी व शेतमजुरांना सर्वाधिक विषबाधा झाली. वंदली गावातील १२ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे. रितेश सतीश चौधरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या पिके जमिनीच्या वर आल्याने पिकांची वाढ व्हावी, पिके अधिक सक्षम व्हावीत व उत्पन्न अधिक प्रमाणात मिळावे, याकरिता शेतकरी पिकांना रासायनिक खत देत आहेत; परंतु यंदा प्रथमच रासायनिक खत देताना शेतकरी व शेतमजुरांना चक्कर येणे, मळमळ होणे, अस्वस्थ वाटणे, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वरोरा तालुक्यातील माढेळी परिसरातील जळका, वडगाव, वंदली येथील फवारणीनंतर विषबाधित झालेल्या शेतकरी व शेतमजुरांना खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वंदली गावातील एकापाठोपाठ १२ जण विषबाधित झाल्याने भरती करण्यात आले. सदर रासायनिक खत वंदली येथील कृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अस्वस्थ वाटले अन् पडला बेशुद्ध
वंदली येथील रितेश सतीश चौधरी पिकांना रासायनिक खत देत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने काही वेळ शेतात आराम केला. दरम्यान, तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला उपचारार्थ सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर तो मरण पावला. या घटनांमुळे शेतकऱ्यांना पिकांना रासायनिक खत देताना मजूर मिळणे दुरापास्त झाले असल्याचे दिसून येत आहे. रासायनिक खत मनुष्याकरिता मारक ठरत असल्याने त्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
संबंधित कृषी केंद्रातील रासायनिक खताचा नमुना परीक्षणासाठी पाठविण्यात आला आहे, तसेच कृषी केंद्रातील ते खत सील करण्यात आले आहे.
- गजानन भोयर, तालुका कृषी अधिकारी, वरोरा