लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आधी चंद्रपूर शहर आणि त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला. सुरुवातीला रुग्णसंख्या झपाट्याने वाढून २२ झाली. त्यानंतर मात्र एकही नवा रुग्ण आढळला नाही. दरम्यान, शुक्रवारी आणखी नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. म्हणजेच २२ पैकी १२ रुग्णांनी कोरोना लढाई जिंकली असून त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. यामुळे घाबरलेल्या जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यामध्ये यापूर्वी २ मे ( एक रूग्ण ), १३ मे ( एक रुग्ण ) १९ व २० मे ( १० रुग्ण ) पॉझिटिव्ह आढळले होते. या एकूण १२ रुग्णांना आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनाने कोरोना आजारातून बरे झाले असल्याचे जाहीर केले आहे. यातील पहिला रुग्ण नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आला होता. तर एका युवतीला दोन दिवसांपूर्वी बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. आरोग्य विभागाने नव्याने जाहीर केलेल्या आरोग्य सूत्रानुसार १९ व २० मे रोजी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना १० दिवसानंतर कोणतेही लक्षणे न दिसल्यामुळे या आजारातून बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता १० रुग्ण जिल्ह्यात वैद्यकीय वास्तव्यात आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या ७१ हजार १३३ आहे. कोविड-१९ संक्रमित रुग्णांची संख्या २२ असून सहा रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. तसेच १६ रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. यातील १२ रुग्णांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकूण अॅक्टीव रुग्णांची संख्या १० झाली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने चंद्रपूर शहर व शहरातून अन्य ठिकाणी जाणाऱ्यांसाठी शकुंतला लॉनमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आतापर्यंत आढळलेले सर्व कोविड रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक नागरिक व बाहेरून आलेल्या प्रत्येकाने आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. जिल्ह्यात दहा कंटेनमेंट झोनमध्ये ७१ आरोग्य पथकामार्फत तीन हजार १५१ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.जिल्ह्यात आता दहा कंटेनमेंट झोनजिल्ह्यात ग्रामीण भागात आठ व महानगरपालिका क्षेत्रात तीन असे एकूण ११ कंटेनमेंट झोन कार्यान्वित होते. परंतु बिनबा गेट येथील कंटेनमेंट झोनला १४ दिवस पूर्ण झाल्यामुळे एक कंटेनमेंट झोन कमी करण्यात आले आहे. आता एकूण १० कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहे. सदर झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आणखी काही कंटेनमेंट झोन शनिवारी कमी होऊ शकतात.संपर्कातील संशयितांचा शोध सुरूकोविड-१९ संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन १४ दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
१२ रुग्णांनी जिंकली कोरोना लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 5:00 AM
जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या ७१ हजार १३३ आहे. कोविड-१९ संक्रमित रुग्णांची संख्या २२ असून सहा रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. तसेच १६ रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. यातील १२ रुग्णांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देकोरोनामुक्त : आता अॅक्टीव रुग्ण केवळ १०