चंद्रपूर : महानगरपालिकेद्वारे मालमत्ता व पाणी कर वसुलीसाठी १४ पथकांकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली. मंगळवारी (दि. १६) शहरातील १२ थकबाकीदारांची नळजोडणी खंडित केली तर अनेक मालमत्तांवर जप्तीपूर्वीची नोटीस लावण्यात आली आहे.
मनपा हद्दीत मोठ्या प्रमाणात मालमत्ता व पाणीकर थकीत असल्याने मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी सक्त कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार ८७ मनपा अधिकारी व कर्मचारी यांची १४ पथके गठित करून वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली. यातील अनेक मालमत्तांवर जप्तीपूर्वीची नोटीस लावण्यात आली तर मोठे थकबाकीदार असलेल्या १२ मालमत्तांची नळजोडणी खंडित केली आहे. काही थकबाकीदारांनी दारी पथक पाहताच रोख, धनादेश अथवा ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केला. काही थकबाकीदारांनी ठरावीक मुदतीत कर भरण्याचे मान्य केले. ज्यांनी मुदत मागितली त्यांची नोंद ठेवली असून वेळेवर करभरणा न झाल्यास नळजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. ही मोहीम महिनाभर सुरू राहणार आहे.
एकमुस्त भरणा करणाऱ्यांना सवलत
शास्तीत सवलत मनपातर्फे ३१ जानेवारी २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. डब्लडब्लूडब्लूडॉटसीएमचंद्रपूरडॉटकॉम या लिंकवर पे वॉटर टॅक्सऑनलाईन या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर एटीटीपीएसचंद्रपूरएमसीडॉटओरजी या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येईल. शिवाय फोन पे, गुगल पे, भीम या युपीआय ॲपवरही मालमता व पाणी कर भरणा करता येतो. मनपाच्या झोन कार्यालयात प्रत्यक्ष व व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून मालमत्ता कर भरता येणार आहे, अशी माहिती मनपाने दिली.