चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ४२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी ४ आॅगस्टला होत आहे. यासाठी जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ७३१ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज निवडणूक विभागाकडे सादर केले होते. गुरूवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ६१८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. काही तालुक्यातील उमेदवारी मागे घेतल्याचा आकडा रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार आता १२ हजार ११३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. गुरूवारी सायंकाळी ४ वाजतानंतर उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर ४३ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होत आहे. १३ जुलैपासून आॅनलाईन नामनिर्देशनपत्र मागविण्यात आले होते. २० जुलै ही आॅनलाईन नामनिर्देशन अर्जाची अखेरची तारीख होती. १९ जुलैपर्यंत तब्बल १२ हजार ७३१ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले. २१ जुलैपासून अर्जाची छानणी करण्यात आली. यात अनेकांचे अर्ज त्रुटीमुळे रद्द झाले. तर गुरूवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६१८ उमेदवारांनी माघार घेतल्याने १२ हजार ११३ उमेदवार रिंगणात आहेत. ४ आॅगस्ट रोजी मतदान तर ६ आॅगस्टला मतमोजणी होणार असून आता गावागावात प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. निवडणूक चिन्हासाठी अधिकाऱ्यांशी अनेकांनी बाचाबाची केल्याचेही दिसून आले.ब्रह्मपुरी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरूवारी अंतिम मुदत होती. लगेच चिन्हांचे वाटप करण्यात येत असल्याने महिलांसह पुरुष उमेदवारांनी राजीव गांधी भवनात मोठी गर्दी उसळली. ५० टक्के महिलांचा एक वर्गच वेगळा बसलेला दिसून आला. तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक व २ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे व चिन्ह वाटपासाठी सर्वच उमेदवार व समर्थक आतूरतेने वाट पाहत बसलेले होते. यापैकी २ पोटनिवडणुकीसाठी कोणीही उमेदवारी अर्ज सादर केले नाही. परंतु त्या ग्रामपंचायती बहुमतात असल्याने पोटनिवडणुकीत कोणीही सहभाग घेतला नाही. तर ७० ग्रामपंचायतीसाठी ५८८ जागेवर उमेदवारी अर्ज सादर केले. छाणणीदरम्यान कालपर्यंत ९१ उमेदवारांनी माघार घेतली होती. तालुक्यातील सुरबोडी, तळोधी (खुर्द), खरकाडा या तीन ग्रामपंचायती अविरोध निवडून आले आहेत. तर चौगाण येथे ग्राम विकास पॅनलचे चार उमेदवार अविरोध आहेत.वरोरा : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याकरीता वरोरा तालुक्यात १६५३ अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत दाखल झाले. त्यात छाणणीमध्ये ६९ अर्ज अवैध ठरले तर अर्ज परत घेण्याच्या दिवशी १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १५६७ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहे. ७९ ग्रामपंचायतीपैकी अर्ध्या ग्रामपंचायतमध्ये महिला आरक्षण असल्याने ५० टक्के ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच विराजमान होणार आहे. वरोरा तालुक्यातील माढेळी ग्रामपंचायत सरपंच अनुसूचित जाती महिला, खेमजई अनुसूचित जाती महिला राखीव, नागरी महिला राखीव नागरिकांचा मागासप्रवर्ग, बोर्डा महिला राखीव (नागरिकांचा मागास प्रवर्ग) शेगाव (बु.), सर्वसाधारण महिला राखीव, भटाळा ग्रामपंचायत सर्वसाधारण महिला राखीव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ठराविक चिन्हांसाठी अधिकाऱ्यांशी बाचाबाचीगुरूवारी सांयकाळी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. मात्र अनेक कार्यकत्यांनी आपल्या उमेदवाराला ठराविक चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची केल्याचा प्रकार दिसून आला. त्यामुळे अधिकाऱ्यांची चिन्ह वाटप करताना कसरत झाली.
१२ हजार ११३ उमेदवार रिंगणात
By admin | Published: July 24, 2015 12:52 AM