चंद्रपूर: सहाव्या टप्प्यातील १२५ शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदली करण्यात आली होती. यानंतर शिक्षकांनी आयुक्त तसेच न्यायालयात धाव घेतल्यानंतर शासनाने यावर निर्णय घेत नव्याने समुपदेशन करण्याचे आदेश दिले होेते. त्यानुसार शनिवारी थेट सीईओ विवेक जाॅन्सन, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या उपस्थितीत १२५ शिक्षकांची समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पडली. यामध्ये काही शिक्षकांना त्यांच्या आवडीनुसार गाव मिळाले असले तरी काही शिक्षक अजूनही नाराजच असल्याची माहिती मिळाली आहे.
यावर्षी शिक्षकांच्या बदल्यांसाठी विविध सहा टप्पे करण्यात आले होते. यानुसार सहाव्या टप्प्यामध्ये सर्वसाधारण क्षेत्रातील सेवाज्येष्ठ शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदली करण्यात आली होती. यामध्ये काही शिक्षकांना सेवेसाठी काहीच महिन्यांचा अवधी शिल्लक होता. त्यामुळे अवघड क्षेत्र न देता सर्वसाधारण क्षेत्रातील गाव देण्याची मागणी या शिक्षकांची होती. यामुळे या शिक्षकांमध्ये मोठा रोष बघायला मिळाला. दरम्यान, काहींनी न्यायालयात तसेच आयुक्तांकडे दाद मागितली. त्यानंतर सरकारने दखल घेत या शिक्षकांची समुपदेशनाने बदली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील १२५ शिक्षकांच्या समुपदेशनाने शनिवारी बदली करण्यात आली. मात्र, यामध्ये काही शिक्षकांना इच्छेनुसार गाव मिळाले, तर काही शिक्षकांना अवघड क्षेत्रातीलच रिक्त जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान, सहाव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदलीसाठी घाई करून आमच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी बदली अधिकारप्राप्त संवर्ग तीनमध्ये मोडणाऱ्या काही शिक्षकांनी सीईओंकडे केली असल्याचे कळते.
काही तालुक्यातील रिक्त जागा दाखविल्याच नाहीसहाव्या टप्प्यातील शिक्षकांना समुपदेशनाने बदली करण्यात आली. यासाठी पंधराही तालुक्यातील रिक्त असलेल्या जागा दाखवतील अशी शिक्षकांची अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने चिमूर, ब्रह्मपुरी, नागभिड, सिंदेवाही, जिवती याच तालुक्यात रिक्त जागा असल्याचे दाखविल्याने शिक्षकांना नाइलाजाने या तालुक्यातच जावे लागले. दरम्यान, रिक्त जागांचे संतुलन राखण्यासाठी या जागा दाखविण्यात आल्या नसल्याची माहिती मिळाली.
पती-पत्नी शिक्षकांमध्ये नाराजीसमायोजनासाठी प्रशासनाने शिक्षकांच्या बदलीसाठी यादी तयार केली. या यादीमध्ये संवर्ग एक तथा दोनच्या स्वतंत्र याद्या तयार केल्या. संवर्ग दोनमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. या संवर्गामध्ये जोडीदाराच्या ३० कि.मी.च्या आतील परिसरात रिक्त जागेवर बदली होईल, अशी अनेक शिक्षकांची आशा होती. मात्र, त्यांचीही निराशा झाली आहे.