मंगल जीवने
बल्लारपूर : तालुक्यात मतदार यादीमध्ये जास्तीत जास्त मतदारांचे नाव समाविष्ट झाले पाहिजे, यासाठी तहसील प्रशासनाने कंबर कसली असून, बल्लारपूर तालुक्यातील १२७ ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती तहसील प्रशासनाने केली आहे.
बल्लारपूर तालुक्यात एक लाख २१ हजार ३६७ मतदार आहेत. परंतु मतदार यादीमध्ये अजूनही हजारो मतदारांचे छायाचित्र त्यांनी अपलोड केले नाही. पुढील सत्र निवडणुकीचे आहे. नगरपरिषद व जिल्हा परिषदच्या निवडणूक होणार आहे. असे असताना तालुक्यातील हजारो मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहणार आहे. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी तहसील प्रशासनाने बल्लारपूर तालुक्यातील सर्व खेडेगावात ४० तर, शहरी विभागात ८७ केंद्राची स्थापना केली आहे. या कामात आशा वर्कर, सहायक शिक्षक, कृषी सखी, लिपिक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शिपाई इत्यादींची नेमणूक करण्यात आली आहे. हे केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन त्यांचा ६ नंबरचा फार्म भरून त्यांचे फोटो मतदार यादीत अपलोड करण्यास सहायता करतील व ओळखपत्रही घरपोच देतील.
बॉक्स
या ठिकाणी असतील केंद्रस्तरीय अधिकारी
ही मोहीम नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी विसापूर, नांदगाव, हडस्ती, गिलबिली, इटोली, मानोरा, किन्ही, कोर्टीमक्ता, कळमना, दहेली, लावारी, बामणी, आमडी, पळसगांव, कवडजई, कोठारी, काटवली इत्यादी ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांचे मोबाईल नंबरही देण्यात आले आहे, अशी माहिती लिपिक कुणाल सोनकर यांनी दिली. तर बल्लारपूर शहरातीळ ३२ वॉर्डांत ४८ ठिकाणी मतदारांचे फोटो अपलोड करण्यासाठी व मतदारांना सहकार्य करण्यासाठी व फार्म भरण्यासाठी सोय करण्यात आली आहे. मतदारांनी त्याच्याकडे संपर्क करून आपले नावात दुरुस्ती व ज्यांचे ओळखपत्रावर छायाचित्र नाही, त्यांनी फोटो अपलोड करण्याचे आवाहन तहसीलदार संजय राईंचवार यांनी केले आहे.
बॉक्स
आठ हजारांवर जणांचे छायाचित्र नाही
बल्लारपूर तालुक्यात एक लाख २१ हजार ३६७ मतदार आहेत. परंतु अजूनही ८ हजारांच्यावर मतदारांनी आपले छायाचित्र ओळखपत्रावर अपलोड केले नाही. यासाठी तहसील कार्यालयाची धडपड आहे की, सर्वांनी आपले छायाचित्र व ओळखपत्रात दुरुस्ती करून घ्यावी. यामध्ये बल्लारपूर शहरात ८४ हजार ७२० मतदार आहेत. त्यापैकी अनेकांची आपली छायाचित्र अपलोड केले नाही.