वरोरा : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाच्यावतीने आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबत आहे. यामध्ये वरोरा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची ३२ पदे मंजूर असून त्यातील १३ पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याने अनेक गावांत आरोग्य कर्मचारी पोहचत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. वरोरा तालुक्यात माढेळी, नागरी, कोसरसार व सावरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राला तालुक्यातील गावे जोडण्यात आली आहे. वरोरा तालुक्यातील अनेक गावात मागील काही दिवसांपासून तापाची साथ सुरू आहे. दररोज तापाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काहींचा अलिकडच्या काळात डेंग्यूने मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेची एकूण ३२ पदे मंजूर करण्यात आली आहे.त्यात मागील काही महिन्यांपासून १३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये नागरी, आजनगाव, वाघनख, चिकणी, माढेळी, कोसरसार, मांगली, सुमठाणा, आठमुर्डी, सावरी, राळेगाव, चारगाव (बु.), साखरा या गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहे. या गावाचा पदभार कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यावर देण्यात आला आहे. त्यामुळे कार्यरत आरोग्य कर्मचारी प्रथम नियुक्त केलेल्या गावांना प्राधान्य देतात. नंतर पदभार असलेल्या गावातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ देत असल्याने घरभेटी, गोळ्या वाटप, रुग्णांचा शोध घेवून अहवाल देणे आदि कामे करताना विलंब लागत असल्याने वरोरा तालुक्यातील आरोग्य विभागाची ग्रामीण भागातील सेवा कोलमडली असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना उपचारासाठी शहरातील खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता रिक्त पदाची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
आरोग्य कर्मचाऱ्यांची १३ पदे रिक्त
By admin | Published: November 22, 2014 10:59 PM