चंद्रपूर : सासऱ्याची हत्या करुन सासू व पत्नीला गंभीर जखमी करणारा जावई निलकंठ कांबळे यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.१६ डिसेंबर रोजी घरगुती वादातून निलकंठ कांबळे याने सासरे ईश्वर मडावी यांची हत्या केली होती. तर सासू कौशल्या मडावी, यमिना मडावी व पत्नी मनिषा कांबळे यांना जखमी करुन पसार झाला होता.
सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी त्याला हिरापूर-कोंढेखल जंगल परिसरातून मंगळवारी अटक केली होती. त्याला न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी करुन त्यांच्याकडून दोन चाकू, तसेच कपडे जप्त केले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे करीत आहेत.