मागणीत मोठी घट : रॉकेल मिळविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचा परिणाम मिलिंद कीर्ती चंद्रपूर जिल्हा अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकांवर करण्यात येणाऱ्या १ लाख ४४ हजार लिटर रॉकेलाचा गैरवापर होत होता. तो डिसेंबर महिन्यापासून थांबल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. गेल्या महिन्यापासून रॉकेल वाटपासाठी रेशनकार्डधारकांना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटलीे. याशिवाय रॉकेलच्या मागणीतही मोठी घट झाली. परिणामी दोन महिन्यांत तब्बल १ लाख ४४ हजार लिटर रॉकेलची बचत झाल्याची बाब पुरवठा विभागाच्या अहवालात नमूद आहे.पुरवठा विभागाने गेल्या तीन महिन्यांचा अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये २०१६च्या आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील रॉकेल पुरवठ्याची माहिती नोंदविण्यात आली आहे. राज्याच्या पुरवठा मंत्रालयाने पात्र लाभार्थ्यांना रॉकेल मिळविण्यासाठी आधारकार्डची सक्ती केली आहे. ही सक्ती करण्यात आल्यावर काही प्रमाणात खळखळ करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिका आधारकार्डशी लिंक केलेल्या नाहीत. त्याकरिता पुरवठा विभागाने गेल्या तीन महिन्यात शिधापत्रिकांवरील सदस्यांच्या आधारकार्ड लिंकिंगची मोहीम राबविली आहे. त्याकरिता वेळोवेळी जनजागृती करण्यात आली. आधारकार्ड लिंकिंग करण्यात आल्यानंतर आता खरे लाभार्थी कोण आहेत, हे पुढे आले आहे.पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारकांना शासनातर्फे रॉकेल पुरवठा करण्यात येतो. परंतु स्वयंपाकाचा गॅसची जोडणी घरोघरी उपलब्ध करण्यात आल्याने पुरवठा करण्यात येणाऱ्या रॉकेलची गरज नसल्याची चर्चा होती. घरगुती ग्राहकांना दिले जाणारे रॉकेल स्वयंपाकासाठी उपयोगात येत नसल्याने त्याचा वापर वाहनांमध्ये इंधन म्हणून करण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. पात्र लाभार्थ्यांचे रॉकेल वाहनांमध्ये जात असल्याने शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा (सबसिडी) गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्याकरिता खरे लाभार्थी शोधून काढणे आवश्यक होते. ते काम शिधापत्रिकांवरील सदस्यांच्या आधारकार्ड लिंकिंगमुळे पूर्ण होत आले आहे.पात्र शिधापत्रिकांमध्ये वाढ चंद्रपूर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात रॉकेलकरिता २ लाख २३ हजार २६० शिधापत्रिका पात्र होत्या. नोव्हेंबर महिन्यात पात्र शिधापत्रिकांमध्ये १२ हजार शिधापत्रिकांची वाढ होऊन २ लाख ३५ हजार ८२० झाल्या. आधारकार्ड लिंकिंगनंतर डिसेंबर महिन्यात त्यात घट होऊन २ लाख २४ हजार ८२९ पात्र शिधापत्रिका शिल्लक राहिल्या. तरीही आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात १ हजार ५६९ शिधापत्रिका अधिक होत्या. तरीही रॉकेल मागणीत घटडिसेंबर महिन्यात १ हजार ५६९ शिधापत्रिका कमी झाल्या. आॅक्टोबर महिन्यात सर्व पात्र २ लाख २३ हजार २६० शिधापत्रिका रॉकेल नियतनासाठी ग्राह्य धरण्यात आल्या. डिसेंबर महिन्यात १ लाख ८७ हजार ८०५ शिधापत्रिका ग्राह्य ठरल्या. ३७ हजार २४ ग्राह्य शिधापत्रिका कमी झाल्यामुळे रॉकेलच्या मागणीतही घट झाली. डिसेंबर-२०१६ मध्ये रॉकेलच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रॉकेल पुरवठ्याकरिता आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. तसेच शिधापत्रिकांवर गॅसधारक स्टँपिंगची नोंद करण्यात आली.गॅसधारकांची रॉकेल लाभार्थी पात्रतेतून कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी शिधापत्रिकांची संख्या घटली आहे. परिणामी डिसेंबर महिन्यात रॉकेल कमी देण्यात आले.-आर. आर. मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर.
१.४४ लाख लिटर रॉकेलचा कोटा घटला
By admin | Published: January 14, 2017 12:38 AM