चंद्रपूर : तालुक्यातील अड्याळ तुकूम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत तब्बल १४ कोटी ९९ लाख २२ हजारांचे विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंत्यांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकावर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंगळवारी (दि. ६) अंतिम शिक्कामोर्तब करून निधीही मंजूर केला आहे.
समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ तुकूम येथे विपश्यना केंद्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. केंद्र उभारणीच्या कामासाठी उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, ब्रह्मपुरी यांनी अंदाजपत्रक तयार केले आहे. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्या परिपत्रकातील १९ एप्रिल, २०२१ मधील दरसूचीवर आधारित हा प्रकल्प १४ कोटी ९९ लाख २२ हजारांचा किमतीचा आहे.
या अंदाजपत्रकाची सार्वजनिक बांधकाम विभागाने (क्षेत्रीय) तपासणी पूर्ण केली. अंदाजपत्रकास क्षेत्रीय स्तरावरील सर्वोच्च तांत्रिक अधिकारी असलेल्या संबंधित मुख्य अभियंता म्हणजेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांची तांत्रिक सहमती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने १४ कोटी ९९ लाख २२ हजारांच्या रकमेस मंगळवारी मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
निधी कुठून खर्च करणार?
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीण शिशुपाल यांनी मंगळवारी (दि. ६) शासन निर्णय जारी केला. हा निधी अनु. जाती-जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक कल्याण, अनु. जाती कल्याण, डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजना आणि लहान बांधकामे या शिर्षांतर्गत २०२३-२४ या चालू वर्षासाठी उपलब्ध निधीतून १४ कोटी ९९ लाख २२ हजारांचा निधी अड्याळ तुकूम येथील विपश्यना केंद्र उभारणीसाठी वापरावा, अशाही सूचना देण्यात आली आहे.
अड्याळ तुकूम येथे १५ एकर जागेत विपश्यना केंद्र उभारण्याचा हा प्रकल्प एकूण ८५ कोटींचा आहे. याकरिता टप्प्याटप्प्याने शासनाकडून निधी मिळेल. आता मंजूर झालेला निधी पहिल्या टप्प्यासाठी आहे.
- अजय चहांदे, उपविभागीय अभियंता (बांधकाम), ब्रह्मपुरी