लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत अतिधोकादायक वर्गात १५ इमारती असून, यातील सात इमारतींवर मनपाने बुलडोझर चालवत भुईसपाट केल्या आहेत, तर उर्वरित सर्व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घर सोडून त्वरित स्थलांतरित करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अपघात होण्यापूर्वी मनपाने केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. महानगरपालिका हद्दीतील बापटनगर, नगिनाबाग, नागपूर रोड, गौतम नगर, रामाला तलावाजवळील १ व मीलन चौक येथील दोन इमारती अशा एकूण सात अतिधोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या धोरणानुसार शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे, अशा अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार आहे.यापूर्वी घुटकाळा वाॅर्ड येथील एकोरी प्रभाग क्र. १० येथील एक अतिधोकादायक इमारत कोसळून एक व्यक्ती जखमी तसेच वित्तहानीही झाली होती. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊन जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतींचा वापर थांबवून तात्काळ स्थलांतरित होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.
३० वर्षांपेक्षा झाला अधिक कालावधी - झोन क्र. १ अंतर्गत ६, झोन क्र. २ अंतर्गत ८, तर झोन क्र. ३ अंतर्गत एक इमारत अतिधोकादायक आहेत. या सर्व इमारतींना ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. - यातील सात इमारती पाडण्यात आल्या आहेत, तर उर्वरितांना घरे रिकामी करण्याच्या दोन नोटिसा देण्यात आल्या असून, आता अंतिम नोटीस बजावण्यात आला आहे.- नागरिकांचा अट्टहास शहरात अनेक धोकादायक इमारती आहे. मात्र काही नागरिक आपल्या अट्टहासामुळे तेथून जाण्याचे टाळतात. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. अन्य धोकादायक इमारतधारकांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांनी धोकादायक इमारतींचा वापर थांबवून तात्काळ स्थलांतरित व्हावे. धोकादायक इमारतींमुळे स्वत:सह इतरांच्या जिवाशी खेळू नये.- विपीन पालिवालआयुक्त, महापालिका, चंद्रपूर