चंद्रपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सक्त झाले आहे. स्वतः वाहतूक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे शनिवारी रस्त्यावर उतरून १५ हायवा ट्रकवर कारवाई करून जप्त केले. तर दोन वाहनाचे फिटनेस रद्द केले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शनिवारी आरटीओ मोरे स्वतः नागपूर-चंद्रपूर मार्गावर हायवा ट्रकचे ब्रेक लाइट, इंडिगेटर, रिफ्लेक्टेर, रेडियम नसणाऱ्या,माल वाहतूक करताना ताडपत्री झाकली नसणाऱ्या, तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या सुमारे १५ वाहनावर कारवाई करून जप्त केले. तर दोन वाहनाचे फिटनेस रद्द करण्यात आले.
कोट
वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून वाहने जप्त करण्यात आली आहे.
वाहतूक नियमानाचे पालन करूनच वाहने चालवावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
-किरण मोरे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर