चिमूर :
तालुक्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना १५ लाख रुपयांची विकास कामे करण्यासाठी निधी देण्याची घोषणा आमदार बंटी भांगडिया यांनी केली होती. म्हसली, हिवरा व जवराबोडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. घोषणेनुसार या तीन ग्रामपंचायतींच्या विकास कामांसाठी पहिला हप्ता आमदार बंटी भांगडिया यांनी वितरित केला आहे.
चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. दरम्यान, आमदार बंटी भांगडिया यांनी ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडून येईल. त्या ग्रामपंचायतीच्या विकास कामांसाठी १५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. तालुक्यातील म्हसली, जवराबोडी व हिवरा ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक झाली होती.
दिलेल्या शब्दाला जागत या तिन्ही ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा स्थानिक आमदार निधीला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याचे पत्र आमदार भांगडिया यांनी दिले.
यामध्ये म्हसली येथे सिमेंट रस्ते व नाली बांधकामासाठी ७ लाख ९९ हजार रुपये, जवराबोडी येथे ७ लाख ९९ हजार तर हिवरा येथे ७ लाख ९८ हजारांचा पहिला हप्ता निधी वितरित करण्यात आलेला आहे.
भिसी येथील छत्रपती शाहू क्रीडा मंडळाला कबड्डी स्पर्धेसाठी ५ लक्ष, नवेगाव (पेठ) येथील गुरुदेव सेवा मंडळ ते धोडीघाटपर्यंत सिमेंट क्राँकीट रस्त्यासाठी ३ लाख ९३ हजार रुपये, आमडी येथील राजू पाटील झाडे ते बाजार चौकापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी १ लाख ८० हजार रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे.