माजरी (चंद्रपूर) : स्थानिकांना रोजगार मिळावा व अन्य मागण्यांसाठी वेकोलिविरुद्ध आंदोलन केल्याने चंद्रपूरशिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्यासह माजरी पोलिसांनी १५ जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला. कोळसा वाहतूक रोखून धरल्याने ४२ लाख ६ हजार ६४७ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार वेकोलि प्रशासनाने पोलिसांत केली.
स्थानिक कामगारांना रोजगार मिळावा आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी सोमवारी एनसीसी कंपनीच्या विरोधात कामबंद आंदोलन केले होते. त्यामुळे कोळसा वाहतूक ठप्प झाली. ४२ लाख ६ हजार ६४७ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली. त्यावरून जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर वेकोलिचे उपमहाप्रबंधक आर. बी. वर्मा यांच्या आदेशानुसार सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३४१, ४२७ सहकलम मु. पो.का १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्यांत जिल्हाप्रमुख शिवसेना (ठाकरे) मुकेश जीवतोडे, युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी, अमित निब्रट, सरताज सिद्दिकी, रमेश मेश्राम, दिनेश यादव, चंद्र डाखरे, राजू आसूटकर, किशोर टिपले, महेश जीवतोडे, इश्तेयाक सिद्दिकी, सचिन साठे, जानू यदुवंशी, मनोज चौधरी, समिम सिद्दिकी, सद्दाम सिद्दिकी अशी आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजितसिंग देवरे करीत आहेत.