चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर १५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या २३ हजार १७५ झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ७०० झाली आहे. सध्या ८२ बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख पाच हजार १४८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८० हजार १२१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये माजरी ता. भद्रावती येथील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३९ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधित आलेल्या १५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील पाच, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपुर एक, भद्रावती एक, ब्रम्हपुरी एक, नागभीड दोन, गोंडपिपरी दोन, राजुरा एक व कोरपना येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.