पंतप्रधान आवास योजना : फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारणार चंद्रपूर : प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या १५ हजार नागरिकांनी आॅनलाईन अर्ज सादर करून स्वप्नातील घराची मागणी केली आहे. अर्ज स्वीकारणे सुरूच असून फेब्रुवारी महिन्यापर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर ज्यांनी अर्ज सादर केले, त्या अर्जांची पडताळणी सुरू असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चंद्रपूर शहर महानगरपलिका क्षेत्रात येणाऱ्या गरिब व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी शून्य कन्सल्टंट, या अकोलाच्या कंपनीला सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले. कंपनीने नोव्हेंबर महिन्यात सर्व्हेक्षणाचे व अर्ज स्वीकारणे सुरू केले. आवास योजनेची माहिती मिळताच, लाभार्थ्यांनी मनपा कार्यालयात लांबच लांब रांगा लावून अर्ज सादर केले. ही प्रक्रिया दीड ते दोन महिने चालली. यात १५ हजार नागरिकांनी अर्ज सादर करून घराची मागणी केली आहे. मनपाच्या एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो नागरिकांनी आॅनलाईन अर्ज सादर केले आहे. आताही अर्ज स्वीकारणे सुरू असून अर्जाची पडताळणी सुरू असल्याची माहिती दिली. ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत, त्या लाभार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे सुचना दिली जात आहे. जे त्रुटीची पुर्तता करणार नाही, त्या लाभार्थ्यांचे अर्ज बाद ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)दिल्लीला पाठविणार अर्ज सर्व्हे करणारी संस्था ‘शून्य कन्सल्टंट’ कंपनीचे चंद्रपूरमध्ये काम पाहणाऱ्या इंगले यांनी सांगितले की, सर्व्हेक्षणाचे काम आताही सुरूच आहे. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी आमच्याकडून सुरू असून अंतिम पडताळणी मनपाचे अधिकारी करणार आहेत. यात पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज म्हाडा कार्यालय, दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
१५ हजार नागरिकांना हवे ‘स्वप्नातील घर’
By admin | Published: January 18, 2017 12:36 AM