लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : गौरी विसर्जनादरम्यान महिलांची लगबग सुरू असताना पोहण्यासाठी नाल्यात उतरलेल्या १५ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी १२.३० वाजताच्या सुमारास अंतरगाव येथे घडली. खुशाल बंडू करकाडे वाहुन गेलेल्या बालकाचे नाव आहे.सावली तालुक्यातील पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत अंतरगाव जवळील धोंडू बाबा आश्रम शाळा शेजारी एक नाला वाहतो. हरतालिका असल्याने गावातील महिला दुपारी १२ वाजताच्या सुमारास गौरी विसर्जनासाठी गेल्या होत्या. या नाल्याच्या दुसऱ्या बाजुला गावातील चार मुले पाण्यात उड्या मारून आनंद घेत होते. गौरी विसर्जनाची लगबग सुरू असताना खुशाल करकाडे हा मुलगा खोल पाण्यात गेला. दरम्यान पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसून आले. हे दृश्य बघताच शेखर भोयर नावाच्या युवकाने पाण्यात उडी मारून खुशालला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे अशक्य झाले.त्यानंतर गावकऱ्यांनी नाल्याचा परिसर पिंजून खुशालचा शोध घेतला. परंतु कुठेच न दिसल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. दुपारी १ वाजतापासून शोध मोहीम सुरू झाली. गौरी विसर्जन केलेल्या डोहात शोध घेण्यात आला. घटनास्थळापासून ५ ते ६ किमी अंतरावरील नाल्यात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली होती. सायंकाळी उशिरा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवानही दाखल झाले. त्यांनीही शोध सुरू केला होता, परंतु त्याचा पत्ता लागला नाही. अशी माहिती पाथरी पोलिसांनी दिली.
१५ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:37 AM