पाणी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश : बंद योजनांचे प्रस्ताव तातडीने पाठवा चंद्रपूर : पाणी टंचाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना व जलस्वराज टप्पा दोन मिळून चंद्रपूर जिल्ह्याला १५० कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अपूर्ण व बंद पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करुन तातडीने पाठवावेत, यासाठी हवा तेवढा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.जिल्हा परिषदमधील मा.सा. कन्नमवार सभागृहात बुधवारी पाणी टंचाई व स्वच्छता मिशनबाबत आढावा सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. नाना शामकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे उपस्थित होते.पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विनंतीवरुन ना. बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छतेचा आढावा घेतला. पाणी पुरवठा विभागाच्या आढाव्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांचा आढावा घेण्यात आला. या वर्षी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कृती आराखडा ११ कोटी १८ लक्ष रुपयाचा मंजूर केला होता. त्यामधून १ हजार उपाययोजना ६९० गावात घेण्यात आल्या. यामध्ये ३४५ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या. १५३ योजना दुरुस्ती करण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ योजना घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी १०१ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मूल व २४ गावातही ४७ कोटीची योजना व बल्लारपूर येथील हडस्ती व १८ गावातील ४० कोटीच्या योजनेचा समाविष्ट करण्यात आला आहे. जलस्वराज्य २ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ५० योजना घेण्यात आल्या आहेत. सात पेरी अर्बन योजना यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पाणी पुरवठा योजनांसाठी १५० कोटींचा निधी
By admin | Published: June 16, 2016 1:21 AM