जिल्हा परिषदेसाठी ३२० : पंचायत समित्यांसाठी ५३३ उमेदवार रिंगणात चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज सादर झाल्यानंतर मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी अर्ज सादर केलेल्या ४२५ उमेदवारांपैकी ६१ तर पंचायत समित्यांसाठी अर्ज सादर केलेल्या ६९९ उमेदवारांपैकी ९७ जणांनी आज माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३२० तर १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी ५३३ उमेदवार रिंगणात आहेत. राजकीय पक्षांनी अनेक दिवसांपासून उमेदरावांच्या याद्या गुलदस्त्यात ठेवल्या. काही दिग्गजाच्या टिकीट कापण्यात आल्याने काहींनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बंडखोरी करणारे उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशी अशा होती. राजकीय पुढाऱ्यांनी तशी बंडखोरांची मनधरणी केली. मात्र अखेरच्या दिवशी सायंकाळपर्यंत अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने बंडखोरीचा ताप आता प्रमुख पक्षांना सहन करावाच लागणार आहे. ज्यांच्या उमेदवारीवर अपील दाखल करण्यात आली आहे, त्यांना १० फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. एकुणच आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात प्रचाराची धूम सुरू झाली आहे. उमेदवार मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेट घेत असून आपल्या क्षेत्रात तळ ठोकून आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) दोन उमेदवारांना एकच निवडणूक चिन्ह वरोरा : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज परत घेते व निवडणुक चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या निवडणुक यादीत वरोरा तालुक्यातील गट-२३ खांबाडा- चिकणी सर्वसाधारण स्त्री या मतदार क्षेत्रात दोन उमेदवारांना सारखे चिन्ह निवडणुक अधिकाऱ्यांनी दिले आहे. या उमेदवारांमध्ये एक राष्ट्रीयकृत पक्षाचा उमेदवार असून दुसरा अपक्ष उमेदवार आहे. वरोरा तालुक्यातील खांबाडा-चिकणी क्षेत्र सर्वसाधारण स्त्री उमेदवारासाठी राखीव आहे. अर्ज छाणणीच्या वेळी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचे अर्ज फेटाळण्यात आले नव्हते. मंगळवारी उमेदवारी अर्ज परत घेवून चिन्ह वाटप करुन अंतीम यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली. त्यात पं.स. मधून आठ उमेदवारांनी तर जि.प. मधून चार उमेदवारांनी नामांकन परत घेतल्याने पं.स. दहा जागा करीता ४८ तर जि.प. च्या पाच जागांकरिता २७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांंतर झालेल्या चिन्हाचा यादी आपल्या स्वाक्षीरीनीशी जाहीर केली. त्यात खांबाडा-चिकणी या जि.प. गटात कल्पना मडावी व ज्योती मत्ते या दोन्ही उमेदवारांना कपबशी चिन्ह दिले आहे. ज्योती मत्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असून एबी फार्म जोडल्यानंतर त्यांना निवडणुक अधिकाऱ्यांनी कपबशी चिन्ह दिले. नकोडा-मारडा जि.प. क्षेत्रात एबी फार्मचा वाद नजीकच्या नकोडा क्षेत्रात काँग्रेसने दोन उमेदवारांना एबी फार्म दिले व दोन्ही उमेदवारांनी नामांकन पत्राला एबी फार्म जोडल्यामुळे जि.प. निवडणूकीची प्रकिया होऊ शकली नाही. या क्षेत्रात काँग्रेस, भाजप, शिवसेना, भारिपच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. मात्र या प.स. गणातील मारडा पंचायत समिती क्षेत्रात निवडणुकीची प्रकिया पूर्ण झाली असून उमेदवाराला चिन्ह देण्यात आले आहे.
१५८ उमेदवारांची माघार
By admin | Published: February 08, 2017 1:56 AM