प्रकाश पाटील
मासळ बु : कोलारा गेट गावालगत वन विभागाचे बफर व कोर झोन क्षेत्राचे दोन गेट आहेत. याच गेटमधून अनेक पर्यटक ताडोबा भ्रमंतीसाठी जातात. रिसोर्टमध्ये मुक्कामी राहतात. परिसरात अंदाजे १४ रिसोर्ट आहेत. रिसोर्टमध्ये रोजच्या पर्यटकांची हजारो रुपयाची उलाढाल होत असते. मात्र, या रिसोर्टकडे चार वर्षांपासून कोलारा ग्रामपंचायतीचे अंदाजे १६ लाख रुपयांचा गृहकर थकीत आहे. त्यामुळे गाव पातळीवरील परिसराचा विकास खुंटला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेली अंदाजे तीन हजार लोकसंख्येची कोलारा ग्रामपंचायत आहे. ताडोबाच्या वाघामुळे कोलारा गाव जगाच्या पटलावर आहे. याच ग्रामपंचायतच्या अंतर्गत परिसरात चौदा रिसार्ट आहेत. याच रिसार्टमध्ये देश-विदेशातील पर्यटक, अभिनेते, खेडाळू, राजकीय नेते पर्यावरणवादी ताडोबातील वाघ व नैसर्गिक वन पाहण्यासाठी आणि संशोधनासाठी महागड्या रिसार्टमध्ये मुक्कामी येतात. मात्र, या महागडया रिसोर्टकडे मागील चार वर्षांपासून गृह थकीत आहे. रिसार्टला रोजची आवक असतानाही गृहकर थकीत ठेवण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. थकीत करामुळे गावात अनेक समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. कोलारा गाव परिसराचा विकास मंदावला आहे.
कोलारा ग्रामपंचायतने गृहकरांचा भरणा करण्यासाठी परिससरातील रिसोर्टला दोनदा मागणी केली. मात्र, रिसार्टधारक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे गावातील समस्या जैसे थे आहे. आता या रिसोर्टधारकांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे.
बॉक्स
ही कामे खोळंबली
गृहकराचा भरणा नियमित असता, तर मागील एका वर्षापासून वॉटर फिल्टर बंद नसते. गावातील नाल्याचा उपसा झाला असता. ग्रामपंचायतीअंतर्गत नवीन नाल्या बांधकाम, रस्ते, महिला व बालकल्याणला १० टक्के निधी, अंगणवाडीला साहित्य पुरविणे, दिव्यांगाला निधी पुरविणे, गावातील दिवाबत्ती, पाण्यासाठी ब्लिचिंग, यासाठी ग्रामपंचायतीच्या गृहकरातूनच खर्च केला जातो. ही कामे खोळंबली आहेत.
कोट
कोलारा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या रिसार्टकडे चार वर्षांपासून गृहकर थकीत आहे. रिसार्ट मालकांना आतापर्यंत तीनदा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसनंतरही रिसार्ट मालकांनी थकीत कराचा भरणा न केल्यास पंचायत समिती पथकामार्फत उचित कारवाई करण्यात येईल.
- वैशाली गेडाम,
ग्रामसेवक ग्रामपंचायत कोलारा