जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी या वर्षी जिल्हाभरातून ३६ प्रस्ताव आले हाेते. यामध्ये माध्यमिक व कला विभागातून प्रत्येकी एक प्रस्ताव होता. या दोन विभागांत कोणतीही स्पर्धा नव्हती; मात्र, प्राथमिक विभागातून १५ पुरस्कारांसाठी अटीतटीची स्पर्धा झाली. शिक्षण विभागाकडून गुणांकनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर २८ ऑगस्ट २०२१ रोजी जि.प. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जि.प. शिक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. काही शिक्षकांच्या नावावरून पदाधिकाऱ्यांमध्येच मोठा कलगीतुरा रंगला. परिणामी, शिक्षकांच्या यादीबाबत गुरुवारपर्यंत सहमतीच झाली नव्हती. शिक्षण समिती सदस्यांच्या स्वाक्षरी होताच ही यादी विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आली. आयुक्तांकडून मंजुरी मिळताच आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी निवड झालेल्या १६ शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दिव्यांग कला, विशेष आणि माध्यमिक विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाचा समावेश आहे.
बॉक्स
असे आहेत जिल्हा आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक
सुनील ढोके जि. प. शाळा (शेणगाव, ता. चंद्रपूर), वनिता बलकी (कुनाडा, भद्रावती), सतीश डांगरे (वडधा तू, वरोरा), नगाजी साळवे (सावरगाव, चिमूर), कालीदास बन्सोड (देवाडा, सिंदेवाही), संजय येरणे (हुंडे, नागभीड), विनोद मदनकर (चिचगाव, ब्रह्मपुरी), प्रकाश शेंडे (जुनासुर्ला, मूल), विजय घोंगे (साखरी, सावली), स्मिता अवचट (पोंभुर्णा,), गौतम उराडे (विठ्ठलवाडा, गाेंडपिपरी), बाबू खाज्यामिया शेख (पंचाळा, राजुरा), राजेंद्र परतेकी (पालडोह, जिवती), पुरुषोत्तम कन्नाके (दहेली जुनी, बल्लारपूर), दिव्यांग कला विशेष गटात गजानन मेश्राम (येल्लापूर, जिवती) आणि माध्यमिक गटातून किशोर निर (जि.प. हायस्कूल विहीरगाव, राजुरा) आदींचा समावेश आहे.