चंद्रपूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ लाख २० हजार १८३ व्यक्तींना एप्रिल ते नोव्हेंंबर या कालावधीत मोफत धान्याचा लाभ घेतला. या योजनेमुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात लाखो कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.
कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले. या कालावधीत उदरनिर्वाहाची सर्व साधने बंद झाली होती. परिणामी, गरीब कुटुंबांसमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे एप्रिल २०२० पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अंमलजावणी सुरू झाली. त्यानुसार प्रतिमहिना प्रतिसदस्य ४ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दोन महिन्यात केवळ तांदूळ वितरीत केले होते. त्यानंतर सरकारने निर्णयात बदल करून तांदूळ व डाळीचे वितरण सुरू केले. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात शासनाने निश्चित केलेल्या नियतनानुसार प्रतिसदस्य तीन किलो गहू मोफत, तांदूळ दोन किलो प्रतिसदस्य, चणाडाळ एक किलो प्रतिकार्डधारक मोफत वितरण करण्यात आले. जिल्ह्यात एकूण १७ लाख २० हजार १८३ व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
आता उदरनिर्वाहाचे संकट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना गरीबांसाठी उपयुक्त ठरली होती. केंद्र सरकारच्या आदेशानुसार या योजनेची डेडलाईन नोव्हेंंबर महिन्यात संपली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाची साधने अजुनही रूळावर आली नाही. अशा स्थितीत योजना बंद झाल्याने आता उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे.
गरीब कुटुंबांमध्ये चिंता
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेपासून गरीब व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम राबविली होती. कार्ड नसलेल्या गरीब नागरिकांनाही मोफत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढली. मात्र योजना बंद केल्याने चिंता व्यक्त करीत आहेत.