बल्लारपूर : शहर व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी नुकतीच तहसील कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी १७६ अर्ज मंजूर करण्यात आले, तर ३४ अर्ज नामंजूर करण्यात आले आहे.
तहसीलदार संजय राईंचवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मासिक सभेत नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, निराधार योजनेचे अध्यक्ष महादेव देवतळे, सदस्य प्रभाकर मुरकुटे, युसूफ शेख, अफसाना सैय्यद, सुनील बावणे, सुमित डोहने, गोदाबाई कुळमेथे यांची उपस्थिती होती. यावेळी कनिष्ठ लिपिक सुनील दडमल व दीपिका कोल्हे यांनी २१० निराधारांचे अर्ज सभेत ठेवले. त्यापैकी १७६ अर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये मंजूर झालेले संजय गांधी निराधार योजनेचे ९५ अर्ज व श्रावण बाळ योजनेतील ८१ अर्ज आहेत व ३४ अर्ज नामंजूर करण्यात आले. याशिवाय बल्लारपूर तालुक्यातील कोरोना काळात एक पालकत्व गमावलेल्या पालकांचे २३ अर्ज तहसील कार्यालयाकडे आले असता त्यापैकी १५ अर्ज मंजूर करून ते समाज कल्याण विभागाकडे पाठविण्यात आले.