: वाळूचे भाव गगनाला भिडले
ब्रम्हपुरी : महसूल विभागाने मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात एकूण २ कोटी ६२ लाख रुपयांचा दंड वसूल केला असून आतापर्यंत १७७ रेती तस्करी प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या कार्यवाहीने रेती तस्करांच्या उरात धडकी भरली असल्याने सध्याच्या परिस्थितीत ब्रम्हपुरी शहरात वाळूचे भाव गगनाला भिडले असून काही दिवसांपूर्वी हजार ते बाराशे प्रति ट्रॅक्टर मिळणारे वाळूचे भाव सध्याच्या परिस्थितीत प्रति ट्रॅक्टर चार हजार रुपये झाले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेतीला परजिल्ह्यात चांगली मागणी असल्याने रेती तस्कर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चकमा देत मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास उत्खनन करून वाहतूक करीत होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत महसूल विभागाचे अधिकारी डोळ्यात तेल घालून कडक पहारा ठेवून सरळ कारवाई करीत असल्याने रेती तस्करांच्या उरात धडकी भरली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत रेतीचे भाव ब्रम्हपुरी शहरात गगनाला भिडले आहेत. रेतीचे भाव वाढल्याने बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे कंबरडे मोडत असून याचा फटका घरकूल लाभार्थ्यांना सुद्धा बसत आहे.
उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात एकूण २ कोटी ६२ लाख रुपयांचा दंड वसूल केला असून आतापर्यंत १७७ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. रेती तस्कर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर रेती घाटातून उत्खनन करून चोरट्यामार्गाने वाहतूक करीत होते. मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री, पहाटे, अगदी सकाळच्या सुमारास धाडी घालून रेती तस्करांवर कारवाईचा बडगा उगारल्याने रेती तस्करांच्या उरात धडकी भरली आहे आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यात वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. रेती सहज मिळत नसल्याने बांधकाम करणाऱ्या नागरिकांना अव्वाच्या सव्वा भावाने रेती खरेदी करावी लागत आहे.