नऊ महिन्यापासून कामात अडथळे : पाणी टंचाईच्या योजना सुरु करण्याची मागणी
मंगल जीवने
बल्लारपूर : राज्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या दीर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करून शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्याच्या पाणीपुरवठा व आरोग्य विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या अंतर्गत ३५ कोटीच्या योजनेमुळे बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.
परंतु मौजा आमडी येथील पाण्याच्या टाकीचे काम विनाकारण थांबविण्यात आले असल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या गावखेड्यातील नागरिकांनी या योजनांतर्गत शुद्ध पिण्याचे पाणी पिण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवाल केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रीड पाणीपुरवठा योजना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल,पोंभुर्णा व बल्लारपूर येथे होत आहे. यामुळे ग्रामीण विभागातील जनतेस शुद्ध पाणी मिळणार आहे. या योजनेंतर्गत येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत बल्लारपूर पॉवर हाऊस जवळील परिसरात १८ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी साडेचार लाख लिटरची मुख्य संतुलन टाकी बांधण्यात आली आहे. तसेच टाकीत पाणी घेण्यासाठी कोलगाव वर्धा नदीवर पंप बसविण्याचे कामही पूर्ण झाले आहे. अलीकडेच या योजनेचा प्रगती आढावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सतीश सुषीर यांनी घेतला आहे व समाधान व्यक्त केले आहे.
या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून मौजा आमडी येथील पाण्याच्या टाकीच्या वादाची तक्रार उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, बल्लारशाह, व जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय कार्यालयाने सांगितले आहे.
बॉक्स या गावाला होणार पाणीपुरवठा
विसापूर,नांदगाव पोडे,बामणी, दुधोली, हडस्ती, चारवट, चुनाभट्टी, भिवकुंड, लावारी, जोगापूर, कोर्टी मक्ता, कोर्टी तुकूम, कळमना, कवडजई, किन्ही, दहेली, केमतुकूम,पळसगाव या गावांना शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. कारण या ग्रामीण विभागात उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो.
कोट
उन्हाळ्यात पाण्याची चणचण सगळीकडे असतेच. परंतु ग्रीड पाणीपुरवठा योजनांतर्गत बामणी गावाला घरोघरी शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याने गावकरी ही योजना सुरु होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
- सुभाष ताजने,सरपंच,ग्रामपंचायत,बामणी.