लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील जनावरांचे चाऱ्याअभावी उपासमार होत आहे. शासनाने तात्काळ मदत केली नाही तर नाईलाजास्तव जनावरे जंगलात सोडावी लागणार, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे.गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेत शेकडो जनावरांचे संगोपन केल्या जात आहे जनावरांसाठी चारा, पाणी, औषधोपचार व संगोपनाचा सर्व खर्च समिती स्वबळावर करत आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गोशाळेतील चारा, पाण्याची समस्या निर्माण झाली.जनावरांना चराईसाठी पाच मजूर वाहनाने दुसऱ्या गावावरून यायचे तेही आता बंद झाले. त्यामुळे जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न अधिकच बिकट होत आहे. समितीकडे आर्थिक ताकद नसल्याने शासनाकडून मदत मिळावी, समितीचे अध्यक्ष सचिन चौधरी व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. परंतू, अद्याप दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे श्रीकृष्ण गोशाळा कायमस्वरूपी बंद करून शेकडो जनावरे गोशाळा असलेल्या लगतच्या जंगलात सोडण्याचा इशारा समितीने दिला.श्रीकृष्ण गोशाळेत १८० जनावरे आहेत. मात्र लॉकडाऊन सुरू असल्याने जनावरांचे संगोपन कठीण झाले. चारा, पाणी व औषधोपचार घेण्यासाठी समितीकडे आर्थिक क्षमता नाही. मुक्या जनावरांचे हाल पाहणे शक्य नसल्यामुळे जंगलात सोडल्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही- सचिन चौधरी, अध्यक्ष, श्रीकृष्ण गोशाळा समिती, गोंडपिपरी