संच मान्यतेचा फटका : ६६१ शिक्षक ठरले अतिरिक्त चंद्रपूर : राज्य शासनाच्या संच मान्यतेचे सुधारित निकष मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांच्या जिवावर उठले आहे. तुकडी व्यवस्था बंद केल्याने जिल्ह्यातील खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील तब्बल ६६१ शिक्षक अतिरीक्त ठरले आहेत. यात १८४ मुख्याध्यापकांचा समावेश असून ही पदे आता रद्द करण्यात येणार आहेत. २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते चवथीच्या शाळांना ५ वा वर्ग तर इयत्ता सातवीला आठवा वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी असलेली तुकडी व्यवस्था बंद करून विद्यार्थी पटसंख्येच्या निकषावर शिक्षकांची पदे ठरविण्यात आली. परिणामी जिल्ह्यातील अनेक शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षकांची पदे अतिरीक्त ठरली आहेत. प्राथमिक शाळा पहिली ते पाचवीमध्ये विद्यार्थी संख्या १५० पेक्षा अधिक असल्यास मुख्याध्यापकाचे पद मान्य करण्यात आले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १३५ पेक्षा कमी, उच्च प्राथमिक शाळेत ९० पेक्षा कमी, माध्यमिक शाळेत ९० पेक्षा कमी पटसंख्या असल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नसल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. या निर्णयामुळे जवळपास ५० च्या वर शाळा मुख्याध्यापकाविना चालवाव्या लागणार आहेत. १८४ शाळांतील मुख्याध्यापक हे अतिरिक्त ठरले असून शासन निर्णयापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या-त्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे किंवा त्यांना शिक्षकांच्या पदांमध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे, असे म्हटले आहे.उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अथवा ज्या संयुक्त शाळांमध्ये १५ पेक्षा अधिक शिक्षकांची पदे अनुज्ञेय असतील, तेथे एक पर्यवेक्षकाचे पद देण्यात येत आहे. शिक्षकांची संख्या ३० पेक्षा अधिक झाल्यास एक अतिरिक्त उपमुख्याध्यापक पद अनुज्ञेय आहे. मात्र विद्यार्थी संख्येचा निकष ठरविण्यात आल्याने जवळपास ६६१ शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरली असून यात अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)मंजूर पदांपेक्षा अतिरिक्त मुख्याध्यापकजिल्ह्यात मुख्याध्यापकांची २२५ पदे मंजूर आहेत. मात्र जिल्ह्यात ४०९ मुख्याध्यापक कार्यरत होते. राज्य शासनाच्या संच मान्यता निकषानुसार अटी लावण्यात आल्याने मुख्याध्यापकांची १८४ पदे अतिरिक्त ठरले आहेत. ६९९ पदवीधर शिक्षकांची गरजजिल्ह्यात सध्या १ हजार ३११ पदविधर शिक्षकांची पदे मंजूर आहे. यापैकी केवळ ६१० शिक्षक कार्यरत आहे. ६९९ पदविधर शिक्षकांची नियुक्ती आणखी आवश्यक आहे. संच मान्यतेच्या सुधारित निकषानुसार ही पदे भरणे शिक्षण विभागाला अनिवार्य झाले आहे. शासनाच्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यात १८४ मुख्याध्यापक व ४७७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे जागा रिक्त असलेल्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे.- संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी,चंद्रपूर
१८४ मुख्याध्यापकांची पदे होणार रद्द
By admin | Published: May 25, 2016 1:27 AM