पालकमंत्र्यांचा पुढाकार : अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यताचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी संकुलातील नविन इमारतीचे बांधकाम व पायाभूत सुविधा निर्मीतीसाठी १८६ कोटी ९ लाख रू. किंमतीच्या अंदाजपत्रकाला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. शासनाच्या महसुल व वनविभागाने २७ मार्च रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर २८ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर येथील वनप्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून वन अकादमीत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अकादमीचे नाव चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी असे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. वन्यजीव व्यवस्थापन आणि वानिकी उत्पादन विषयक प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमीका असलेल्या या वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी संकुलातील नविन इमारतीचे बांधकाम व पायाभूत सुविधा निर्मीतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या १८६ कोटी ९ लाख रू. किंमतीच्या अंदाजपत्रकाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याने या वन अकादमीच्या निर्मीतीचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे. ना. सुधीर मुनगंटीवार सदर वन अकादमीबाबत सुरूवातीपासूनच आग्रही होते. सर्वाधिक जंगल आणि व्याघ्र प्रकल्प तसेच अभयारण्य विदर्भात असल्यामुळे चंद्रपूर येथे वन अकादमी स्थापन होणे गरजेचे होते. ही गरज लक्षात घेता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री पदाची धुरा सांभाळताच चंद्रपूर येथे वन अकादमीला मान्यता मिळविली. (शहर प्रतिनिधी)
वन अकादमीच्या इमारतीसाठी १८६ कोटी
By admin | Published: March 30, 2017 12:48 AM